Thursday, May 2, 2024
Homeनगररब्बी हंगामासाठी 1 लाख 30 हजार हेक्टरवर पेरण्या

रब्बी हंगामासाठी 1 लाख 30 हजार हेक्टरवर पेरण्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

परतीच्या लांबलेल्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्यांना उशीरा सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

यात प्रामुख्याने ज्वारी पिकाच्या पेरणीला उशीर झाला असून यामुळे यंदा जिल्ह्यात नियोजनानुसार ज्वारीची पेरणी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 30 हजार हेक्टरवर पिकांच्या पेरण्या झाल्या असून पेरणीची टक्केवारी ही अवघी 20 टक्के आहे.

नगर जिल्हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 77 हेक्टर असून त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होत असते. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्यांत परतीच्या पावसाने जिल्ह्याला धो-धो धुतल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्यासाठी शेतकर्‍यांना वापसा मिळाला नाही.

आजही शेताच्या कडेला असणार्‍या ओढ्या-नाल्यातून पावसामुळे साचलेले पाणी वाहत आहे. यामुळे प्रामुख्याने ज्वारीच्या पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 17 हजार हेक्टवर ज्वारीच्या पेरण्या झाल्या असून पेरण्याची टक्केवारी ही 25 टक्के आहे. यामुळे यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ज्वारी पिकाच्या पेरण्या कमीच होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. यामुळे हंगामातील दुसरे प्रमुख पिक असणार्‍या गव्हाच्या पेरण्यांना सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत 213 हेक्टरवर गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. यासह हरभरा पिकाची 683 हेक्टवर पेरणी झाली असून चारा पिक असणार्‍या मका पिकाची 2 हजार 169 हेक्टरवर पेरणी झाली आहे. हंगामातील गळीत धान्य पिके असणार्‍या करडई, तीळ, जवस, सुर्यफुल या पिकांच्या पेरणीचे प्रमाण देखील अत्यल्प आहे.

यंदा नो चारा टंचाई

जिल्ह्यात परतीच्या पावसाने दणका दिल्याने उत्तेरसह, दक्षिण भागात मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे शेतकर्‍यांंनी मोठ्या प्रमाणात चारा पिकांंची लागवड केली असून त्यांची आकडेवारी ही 11 हजार हेक्टरच्याा पुढे आहे. यामुळे यंदा जिल्ह्यात चार टंचाईची परिस्थिती राहणार नाही.

पिकनिहाय पेरण्या कंसात टक्केवारी

ज्वारी 1 लाख 17 हजार हेक्टर (25 टक्के), गहू 213 हेक्टर (शुन्य टक्के), हरभरा 6 हजार 604 हेक्टर (चार टक्के), करडई 206 हेक्टर (32 टक्के), जवस 28 हेक्टर (22 टक्के), सुर्यफूल 8 हेक्टर (5 टक्के यांचा समावेश आहे. यासह 2 हजार 685 हेक्टवर फळबागांची लागवड नव्याने झालेली आहे.

ऊस लागवड जोरात

जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसामुळे ऊस पिकाच्या लागवडीचे प्रमाण वाढत आहे. अनेक भागात नव्याने लागवडी सुरू असून 35 हजार 230 हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. उत्तरेतील तालुक्यांसह सिंचनाची सुविधा असणार्‍या भागात नवीन लागवडी जोरात सुरू आहेत.

40 हजार हेक्टरवर कांदा

जिल्ह्यात कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 550 हेक्टवर कांदा पिकाची लागवड झालेली आहे. नव्याने कांदा लागवडी सुरू असून शेतकरी चढ्या दराने कांदा रोप घेऊन लागवड करताना दिसत आहेत. यंदा कांद्याचे मार्केट जोरात असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या