पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
शासनाच्या विविध योजनांसाठी पिकपेर्याची ऑनलाइन नोंद आवश्यक आहे. यासाठी शासनाने मोबाईलवर नवे व्हर्जन उपलब्ध केलेले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात (Rabbi Season) 15 जानेवारीपर्यंत या नोंदीला मुदत असली तरी दोन महिन्यात पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) येथील फक्त 25 टक्के व राहाता (Rahata) तालुक्यातील केवळ 15 टक्के शेतकर्यांनी ई-पीक नोंदणी केलेली आहे. रब्बी हंगामात पिंकाची पेरणी केलेल्या शेतकर्यांना ई-पीक पाहणीद्वारे पीक पेर्याची नोंद करणे आवश्यक आहे. शासनाच्या कृषी विषयक योजना, पीक कर्ज (Crop Loan), नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान, खरेदी-विक्री, शासकीय अनुदान, पिक विमा (Crop Insurance) आदी सर्व प्रकारात ऑनलाइन पीक पेर्याच्या नोंदीची पडताळणी करण्यात येते.
त्यामुळे अशा प्रकरणात शेतकर्यांद्वारे पीकपेरा नोंद नसल्यास शेतकरी शासन लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. हे नोंदणी अभियान 1 नोव्हेंबर पासून सुरू झालेले आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत या पीक पेर्याची नोंदणी शेतकर्यांना स्वतः आपल्या मोबाईलद्वारे करता येणार आहे. नोंदणी सुरू होवून दोन महिने उलटून गेलेले आहेत. तरीही शेतकर्यांनी यामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात सहभाग घेतल्याचे दिसून येते. नोंदणीसाठी अवघे दहा दिवस बाकी राहिले असताना पिंपरी निर्मळ मधील 2 हजार 392 शेतकर्यांपैकी अवघ्या 560 शेतकर्यांनी आपली पाहणी केली तर राहाता तालुक्यातील 61 गावांमधील 75 हजार 104 हेक्टर मधील शेतकर्यापैकी अवघ्या 9 हजार 900 शेतकर्यांनी पिक पहाणी केली आहे.
चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तसेच निळवंडे (Nilwande) प्रवरा गोदावरीचे पाणी सुटल्याने तालुक्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात रब्बीची पिके शेतकर्यांनी उभी केलेली आहेत. मात्र पीक पाहणी करण्यात शेतकरी कमी पडत असल्याने पुढील एक दोन महिन्यात गारपीट, वादळ (Storm), अवकाळी पाऊस झाल्यास शेतकर्याचे नुकसान होऊ शकते. मात्र पीक पाहणी नसल्याने या शेतकर्यांना पिक विमा योजना, शासकीय अनुदान तसेच इतर लाभांपासून वंचित रहावे लागणार आहे. यामुळे शेतकर्यांना मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.