Friday, May 3, 2024
Homeनगररब्बीसाठी एक तर उन्हाळ्यात तीन आवर्तने

रब्बीसाठी एक तर उन्हाळ्यात तीन आवर्तने

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रब्बीसाठी एक तर उन्हाळ्यासाठी तीन आवर्तने देण्याचा आदेश ना. छगन भुजबळ यांनी गोदावरी उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाटबंधारे विभागाला दिले.

- Advertisement -

मात्र कालवा दुरूस्ती प्रश्नी कोणताही ठोस निर्णय झाला नाही तर गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणाच्याप्रश्नी ना. भुजबळ यांनी नेतृत्व करावे व हा प्रश्न सोडवावा, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी राहू, अशी भूमिका आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली.

गोदावरी उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राहाता येथे पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहावर झाली. यावेळी आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, कोपरगावचे आ. आशुतोष काळे, सिन्नरचे आ. माणिकराव कोकाटे, श्रीरामपूरचे आ. लहु कानडे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, बाजार समिती सभापती भाऊसाहेब जेजूरकर, कमलाकर कोते, अधिक्षक अभियंता आहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे यावेळी उपस्थित होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष ना. भुजबळ यांनी सर्व शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेतल्या व चालू हंगामात गोदावरी कालव्याचे रब्बीसाठी एक आवर्तन तर उन्हाळ्यात तीन आवर्तन देण्याच्या सुचना पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना देत योग्य पाण्याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. तसेच पाणी न भरता पाणीपट्टी वसुल केली जाते. या शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून शेतकर्‍यांना पाणी दिले तरच पाणीपट्टी आकारा, अशा सुचना दिल्या.

गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणासाठी पाटबंधारे विभागाने 84 कोटीचा प्रस्ताव सादर केला असून अध्यक्ष या नात्याने या भागातील कालव्यांचे काम करणे ही माझी जबाबदारी आहे.कालव्यांचे नुतनीकरण व्हावे व पाणी टेलपर्यंत मिळावे यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन प्रश्न मार्गी लावू असे यावेळी सांगितले. समुद्राला व गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवून कोणत्याही मार्गाने ते गोदावरी खोर्‍यात आणावे लागेल यासाठी सर्व आमदारांनी आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. राधाकृष्ण विखे म्हणाले, गोदावरी कालव्याचे नुतनीकरण होणे आवश्यक असून आहे. प्रत्येकवेळी पाण्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर यावे लागते. या कालव्यांच्या नुतनीकरणास 600 कोटी रूपये लागतात. मात्र सध्या सरकारकडे इतका पैसा नाही. याप्रश्नी सर्वांनी एक होणे गरजेचे आहे. गोदावरी कालव्याचे नुतनीकरणप्रश्नी ना. भुजबळ यांनी नेतृत्व करावे आम्ही सर्व आमदार त्यांच्या पाठीशी राहू. हा ज्वलंत प्रश्न त्यांनीच सोडवावा, असे आवाहन यावेळी केले.

यावेळी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मागील सरकारच्या धोरणावर सडकून टिका केली. ज्या मंत्र्यांना कालवा कोठून सुरू होतो व कोठे जातो हे माहीत नाही असे मंत्री व अधिकारी मुंबईत बसून कालवा सल्लागार समितीची मिंटींग घेत त्याला विरोध करून कालव्याच्या मिटींगा कार्यक्षेत्रातच घ्याव्या ही मागणी लावून धरली व तसा निर्णय घेण्यास भाग पाडले. कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी हवे तर आमदार निधीतून सर्व आमदारांचे निधी या प्रश्नी खर्च करा आमदार निधी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी कालव्याच्या दुरूस्तीसाठी वापरू.

आ. आशुतोष काळे म्हणाले, 1965 नंतर कालव्याचे नुतनीकरणाचे काम झाले नाही. चांगला पाऊस झाल्याने रब्बीचे उशीरा आवर्तन द्या त्याऐवजी उन्हाळ्यात पाणी द्या. अधिकारी फार हुशार झाले कोपरगाव मतदार संघातील टेलच्या लोकांना सांगतात आमदारांनी वर पाणी सोडले तर वरच्या भागातील लोकांना सांगतात खाली पाणी चालू हे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करून भांडणे लावतात. मात्र या दरम्यान पाणी कुठे मुरते याचा शोध घ्यावा.

आ. कानडे यांनी टेलच्या चारी नं. 19 व 20 चारीच्या व्यथा मांडल्या. गेली अनेक वर्ष माझ्या मतदार संघातील शेतकर्‍यांना पाणी मिळाले नाही मागीलवेळी प्रयत्न केल्याने ते मिळाले. चार्‍या दुरूस्त करून सर्वांना पाणी मिळावे अशा सुचना त्यांनी केल्या. खा. सदाशिव लोखंडे यांचेही यावेळी भाषण झाले तर कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

सल्लागार समितीच्या बैठकीचे श्रेयावरून आ. कोकाटे व आ.काळे यांच्यात जुगलबंदी रंगली. मात्र आ. माणिकराव कोकाटे यांनी हा दावा खोडून काढत जाहीर भाषणात स्पष्ट केले की मी या बैठका घ्याव्या यासाठी नागपुरला मंत्री महाजनांबरोबर भांडलो तेव्हा ठराव घ्यायला लावला नंतर जयंत पाटलांशी बोलून त्या त्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थीतीत कालव्याच्या प्रमुख ठिकाणी बैठक घ्यायला लावल्या या बैठकीच्या श्रेयवादाची चर्चा चांगलीच रंगली.

या चर्चेत अँड रघुनाथ बोठे मोहनराव सदाफळ, अनिल कोते. विठ्ठलराव शेळके आदी शेतकर्‍यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. गेल्या चार वर्षानंतर प्रथमच कालवा सल्लागार समितीची बैठक कालव्यावर शेतकर्‍यांसमवेत होत असल्याने सर्वच शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या