Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता पंचायत समिती यशवंत पंचायत राज अभियानात नाशिक विभागात प्रथम

राहाता पंचायत समिती यशवंत पंचायत राज अभियानात नाशिक विभागात प्रथम

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा उत्कृष्ठ दर्जा राखल्यामुळे

- Advertisement -

राहाता तालुका पंचायत समितीला विभाग पातळीवरील रु .11 लक्ष चा यशवंत पंचायत राज अभियान 2020-21 करिता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे

ग्रामीण भागाच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्था मार्फत राबविल्या जातात. राहाता पंचायत समितीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच विविध राबविलेले सामाजिक उपक्रम यामुळे विभाग स्तरावर पंचायत समितीला प्रथम क्रमांकाचा रुपये 11 लाखांचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे सभापती सौ. नंदाताई तांबे आणि उपसभापती श्री ओमेश जपे यांनी सांगितले.

मा.मंत्री आ .राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी वेळोवेळी विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेला निधी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने केलेला पाठपुरावा आणि तालुक्यातील विकासाच्या संदर्भात युवानेते खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्व गावांना विकास प्रक्रीयेत सामावून घेण्यासाठी केलेली प्रभावी कार्यवाही आणि शासन आपल्या दारी या उपक्रमातून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळेच प्रशासकीय स्तरावर राहाता पंचायत समितीचा दर्जा गुणात्मकदृष्ट्या यशस्वी झाला असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबरोबरच स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, बायोगॅस , विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या उपक्रमांबरोबर वेळेवर घेण्यात आलेल्या मासिक सभा, सामाजिक बांधिलकीतून प्लॅस्टीक बंदी, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान, आरोग्य विषयक कार्यशाळा, पर्यावरण पुरक कार्यक्रम, हागणदारी मुक्त तालुका आणि माहिती अधिकार कार्यशाळा या बरोबरच पंचायत समिती खडज मानांकन मिळालेली असल्याने प्रशासकीय कामकाजात आलेली गतिमानता ,लेखा परीक्षणाची वेळोवेळी पुर्तता करण्यात सातत्य राखल्यामुळेच राहाता पंचायत समितीला विभाग स्तरावरील पुरस्कार मिळण्यात यश आले असल्याचे गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले.

राहाता पंचायत समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आ.राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांनी पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

सांघिक प्रयत्नांचे यश

राहाता पंचायत समितीला विभाग स्तरावर मिळालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हे सांघीक प्रयत्नांचे यश असल्याची प्रतिक्रीया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली. पंचायत समितीच्या माध्यमातून पदाधिकारी, आधिकारी आणि कर्मचारी यांनी सामूहिकपणे निर्णयांची केलेली अंमलबजावणी, उपलब्ध झालेल्या निधीचा योग्य विनीयोग आणि प्रशासकीय कामात दाखविलेली तत्परता यामुळेच हे मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या