दिल्ली । Delhi
देशात सध्या वाढती महागाई, इंधनाची टंचाई आणि बेरोजगारी यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणी बजेट कोलमडल्याने त्रस्त असतानाच, आता देशाच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील एका वर्षात पंतप्रधानपदावरून पायउतार होतील,” असा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी हे भाकीत वर्तवलं. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी यापूर्वी वर्तवलेले काही राजकीय आणि आर्थिक अंदाज खरे ठरले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडतील, असं ते म्हणाले होते आणि प्रत्यक्षात तसंच घडलं. त्यानंतर देशावर आर्थिक संकट येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता; ज्याचे संकेत पुढे खुद्द पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना काटकसर करण्याचा सल्ला देताना दिले होते. त्यामुळे आता राहुल गांधींच्या या नव्या वक्तव्याकडे राजकीय विश्लेषक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.
नरेंद्र मोदींना हे पद का सोडावं लागेल, याचं विश्लेषणही राहुल गांधी यांनी या बैठकीत मांडलं. ते म्हणाले की, सध्याची आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. देशांतर्गत पातळीवर महागाई आणि इंधनाच्या टंचाईमुळे जनतेमध्ये तीव्र संताप आहे. अनेक भागांत पेट्रोल-डिझेलसाठी वाद होत आहेत, तर गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा आणि विशेषतः देशातील तरुणाईच्या मनातील वाढत्या असंतोषाचा थेट परिणाम भारतीय राजकारणावर होणार असून, यामुळेच मोदींना एका वर्षात पायउतार व्हावं लागेल, असा दावा त्यांनी केला.
याच बैठकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी ‘मुस्लिम’ या शब्दाऐवजी ‘अल्पसंख्याक’ असा शब्द वापरण्याचा आग्रह धरला होता. त्यावर राहुल गांधी यांनी स्पष्ट आक्षेप घेतला. नेत्यांना खडे बोल सुनावताना ते म्हणाले, “मुस्लिम शब्द वापरण्यास अजिबात घाबरण्याची गरज नाही. देशात अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कोणत्याही समाजाला आपण उघडपणे पाठिंबा दिला पाहिजे.” काँग्रेस पक्ष हा हिंदू, दलित, उच्चवर्णीय, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध किंवा जैन अशा सर्वच समाजातील नागरिकांच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभा आहे आणि कोणालाही घाबरण्याची गरज नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.




