Monday, June 22, 2026
Homeराजकीयलोकशाही धोक्यात, आनंद कसला? बंगालच्या निकालानंतर राहुल गांधींनी स्वकीयांचे टोचले कान

लोकशाही धोक्यात, आनंद कसला? बंगालच्या निकालानंतर राहुल गांधींनी स्वकीयांचे टोचले कान

मुंबई । Mumbai

पश्चिम बंगालच्या रणांगणात तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेचा बुरुज ढासळल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे भाजप या विजयाचा जल्लोष करत असताना, दुसरीकडे ‘इंडिया’ (INDIA) आघाडीमधील काही घटक पक्षांकडून ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर व्यक्त होणाऱ्या आनंदाने काँग्रेस नेते राहुल गांधी संतापले आहेत. “ममताजींची चेष्टा करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, हा पराभव केवळ एका पक्षाचा नसून भारताची लोकशाही नष्ट करण्याच्या दिशेने भाजपाचे मोठे पाऊल आहे,” अशा शब्दांत राहुल गांधींनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली आहे. गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा त्यांनी ‘दीदीं’च्या बाजूने विधान केले. ते म्हणाले, “काँग्रेसमधील काही लोक आणि इतर मित्रपक्ष तृणमूलच्या पराभवावर आनंद साजरा करत आहेत, ही खेदाची बाब आहे. आसाम आणि बंगालमध्ये जो जनादेश फिरवण्यात आला आहे, ती सरळ सरळ मतांची चोरी आहे. ममताजींच्या आरोपांशी मी पूर्णपणे सहमत आहे; बंगालमध्ये १०० हून अधिक जागांवर गैरप्रकार झाले आहेत.”

गांधी यांनी पुढे ठणकावून सांगितले की, “आता क्षुद्र राजकारण बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. ही लढाई राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाची नाही, तर ही भारताच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची लढाई आहे.”

केवळ राहुल गांधीच नव्हे, तर शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडिया आघाडीतील अंतर्गत दुफळीवर कडक टीका केली आहे. “आघाडीतील घटक पक्षांनीच एकमेकांच्या पराभवावर आनंद व्यक्त करणे हे क्लेशदायक आणि लाजीरवाणे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

चतुर्वेदी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, जेव्हा अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव यांचा पराभव झाला किंवा ‘आप’मध्ये फूट पडली, तेव्हाही काही लोकांनी अशीच शेखी मिरवली होती. आता हेच लोक आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत आहेत. ही अंतर्गत फूटच भाजपच्या पथ्यावर पडते आणि मतदार अशा अस्थिरतेला नाकारतात, असा इशाराही त्यांनी दिला.

बंगालच्या निकालानंतर विरोधी पक्षांमधील ही ‘तू-तू मैं-मैं’ भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी धोक्याची ठरू शकते. राहुल गांधी आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केलेले मुद्दे हेच दर्शवतात की, जर विरोधकांनी आपापसातील हेवेदावे सोडले नाहीत, तर भाजपची विजयाची घोडदौड रोखणे कठीण जाईल. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष ममता बॅनर्जी यांच्या आगामी कायदेशीर लढाईकडे आणि ‘इंडिया’ आघाडीतील या नव्या वादाच्या वळणाकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Gokul Gite : मंत्री उदय सामंत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंना घेऊन...

0
नाशिक | Nashik नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) निकालात महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे...