नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईचा सर्वसामान्यांना जास्त फटका बसत आहे. महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अशामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी भाजी खरेदी करण्यासाठी थेट मार्केटमध्ये पोहचले. राहुल गांधींनी तेथील दुकानदारांना लसून, टोमॅटो आणि इतर भाज्यांचे दर विचारले. दुकानदाराने त्यांना सांगितले की लसूण ४०० रुपये किलो आहे. या भाजीमंडईला दिलेल्या भेटीचा एक व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केलेला आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत यावेळी काही स्थानिक महिला देखील होत्या ज्या भाज्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आल्या होत्या. यावेळी ते वेगवेगळ्या भाज्यांचे दर विचारत आहेत. भाज्यांचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. व्हिडीओ पोस्ट करताना राहुल गांधी यांनी लिहीलेय की कधी ४० रुपयांना मिळणारा लसूण आता ४०० रुपयांचा झाला आहे. वाढत्या महागाईने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे आणि सरकार कुंभकर्णासारखे झोपलेले आहे.
भाजी खरेदी करताना एका महिलेचे म्हणणे आहे की, वर्षभरात एकही भाजी स्वस्त झाली नाही. आम्हा मध्यमवर्गीय लोकांसाठी मूलभूत गोष्टी असलेला बटाटा आणि कांदा स्वस्त झाला नाही. एका महिलेने राहुल गांधींना सांगितले की, आम्ही चार-पाच भाजी घ्यायला आलो होतो, पण दोन भाजी घेऊन घरी जात आहोत. कोणत्याच भाजीचा भाव ३० ते ३५ रुपये नाही, ज्या काही भाज्या मिळतात त्या ५० रुपयांवर आहेत. यावेळी एका भाजी विक्रेत्याने भाज्याचे दर खूप वाढल्याचे मान्य केले. त्याने सांगितले की, ‘यावेळी खूप महागाई आहे. यापूर्वी ऐवढे भाव कधीच नव्हते.’
राहुल गांधी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ दिल्ली येथील गिरीनगर समोरील हनुमान मंदिर भाजी मंडईचा आहेत. या व्हिडिओ महिला बोलताना दिसत आहेत की त्यांना राहुल गांधी यांना चहासाठी बोलावले आहे. म्हणजे त्यांना घरी येऊन पाहावे किती महागाई वाढलेली आहे. राहुल गांधींना महिला तक्रार करताना दिसत आहेत की पगार तर वाढलेला नाही.
राहुल गांधींनी भाजी विक्रेत्याला लसणाचा भाव विचारला. यावर महिला म्हणते की, आम्ही लसूण विकत घेऊ शकणार नाही ऐवढे भाव आहेत. ती पुढे म्हणते की, सोनं स्वस्त झाले, लसूण महाग झाले. भाजी विक्रेत्याने लसणाचा भाव ४०० रुपये प्रतिकिलो असल्याचे सांगितले. त्याचे दर कमी केले तरच आम्ही ते खरेदी करू शकतो. महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भाजी विक्रेत्याने ९० रुपये पावकिलो लसूण देण्याचे मान्य केले.