नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज(३ फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील ‘मेक इन इंडिया’ आणि एकंदरीत उत्पादन क्षेत्रावर निशाणा साधला. मेक इन इंडिया ही चांगली कल्पना होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी प्रयत्नही केले. मात्र या योजनेला अपयश आले आहे हे मान्यच करावे लागेल असे वक्तव्य लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुला गांधी यांनी केले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, ‘राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत नवीन काहीच नाही. यात बेरोजगारीचा उल्लेख नाही. यूपीए किंवा एनडीएने तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिले नाही. मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान जे बोलले ते चांगलेच आहे. पण उत्पादनात अपयश येत आहे. आम्ही पंतप्रधानांना दोष देत नाही, पंतप्रधानांनी प्रयत्न केला, कल्पना योग्य होती पण ते अपयशी ठरत आहेत. त्याचा परिणाम अर्थातच नोकऱ्यांवर म्हणजेच रोजगारांवर झाला.
राहुल गांधी म्हणाले, मागच्या ६० वर्षात आपण उत्पादनाचा आलेख यावेळी सर्वाधिक खालावला आहे. मेक इन इंडियाचा उल्लेख करत राहुल गांधींनी स्मार्ट फोन दाखवला आणि म्हणाले की हा फोन भारतात तयार झाला आहे. मात्र या फोनचे सगळे सुटे भाग चीनमधून आले आहेत. आपण तो इथे फक्त जोडला आहे. सध्या भारतात असमानता वाढली आहे. सध्याच्या घडीला जग एका क्रांतीच्या दिशेने वाटचाल करते आहे. ही क्रांती अणु उर्जेची आहे. याआधी जी क्रांती होती ते संगणक युग होते. मी वाजपेयींचा सन्मान करतो, मात्र अटलबिहारी वाजपेयी संगणकाला हसले होते, या गोष्टीचे काय काम? वगैरे म्हणत या गोष्टीची खिल्ली उडवली गेली. पण आज संगणक ही काळाची गरज आहे.
राहुल गांधी यांनी रोबोट्सपासून ड्रोनपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आणि सांगितले की, ‘आज लोक एआयबद्दल बोलत आहेत. एआय डेटावर कार्य करते. डेटाशिवाय काहीही नाही. प्रश्न असा आहे की एआय कोणता डेटा वापरत आहे? भारताकडे कोणतीही आकडेवारी नाही. एकतर AI चीनी किंवा अमेरिकन डेटा वापरेल. मी या देशातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशात क्रांती येणार आहे. आपण पेट्रोलवरुन इलेक्ट्रिक मोटरवर स्विच करत आहोत. युद्ध, वैद्यकीय उपचार, शिक्षण, सर्वकाही बदलत आहे. कोणताही देश उपभोग आणि उत्पादन या दोन गोष्टींवर चालतो. १९९० पासून सर्व सरकारांनी उपभोगावर चांगले काम केले आहे. रिलायन्स, अदानी, टाटा, महिंद्रा या सर्वांचा झपाट्याने विकास झाला, पण एकूणच देशाचा विकास झाला नाही.’
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा