नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सभागृहात भाषण केलं. सभागृहात बोलताना राहुल गांधी यांनी अमेरिकेवर निशाणा साधलाच पण केंद्रातल्या मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. “अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकारने ट्रेड डील केलीय. भारताने त्यांचं ऐकलं नाही तर ते पुन्हा टॅरिफ वाढवतील. अमेरिकेची नजर भारताच्या डेटावर आहे” असे राहुल गांधी म्हणाले.
तुम्ही (केंद्र सरकारने) भारत विकला आहे. तुम्हाला भारत विकण्याची लाज वाटत नाही का? तुम्ही आमची आई, भारतमाता विकली आहे, अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, मला माहित आहे की पंतप्रधान सामान्य परिस्थितीत भारत विकणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी भारत का विकला? कारण ट्रम्प त्यांचा गळा दाबत आहेत. त्यांनी त्यांचा गळा दाबला आहे. पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती आपल्याला दिसते. असा खळबळजनक आरोप करत राहुल गांधींनी संसदेत वादळ निर्माण केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही खडे बोल सुनावले.
“ज्या डेटाच्या जोरावर भारत २१ व्या शतकात महासत्ता बनू शकला असता, तोच डेटा मोदी सरकारने परकीयांच्या हाती सोपवला आहे,” अमेरिकेला जर त्यांचे डॉलरचे वर्चस्व टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना भारतीय डेटाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारने या ट्रेड डीलमध्ये आपल्या डेटावरील नियंत्रण सोडून दिले आहे. अमेरिकेमध्ये फ्री डेटा फ्लो आणि डिजिटल टॅक्सवर मर्यादा आणून सरकारने देशाचे नुकसान केले आहे.” असा घणाघाती आरोप करत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना निरुत्तर केले.
“प्रत्यक्षात आपण युद्धाच्या काळात जगतोय. तुम्ही पाहू शकता युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. गाजामध्ये युद्ध आहे. मिडिल ईस्टमध्ये युद्ध आहे. इराणमध्ये युद्धाचा धोका आहे. आपण ऑपरेशन सिंदूर केलं. आपण अस्थिरतेच्या विश्वात जगतोय. डॉलरला आव्हान दिलं जातय. माझे मित्र समजतायत, मुख्य खेळ हा आहे की डॉलरला आव्हान दिलं जातय. US च्या दबदब्याला आव्हान दिलं जातय. आपण सुपरपावरच्या विश्वाकडून कुठल्या नव्या देशाकडे जातोय. त्याचा आपण अंदाज लावू शकत नाही” असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल म्हणाले, केंद्र सरकारने व्यापार करारात गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे; यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नाही. इतिहासात पहिल्यांदाच, आमचे शेतकरी संकटाचा सामना करत आहेत. अमेरिकेची आयात ४६ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून १४६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल. आमचे शुल्क ३ वरून १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि त्यांचे शुल्क १६ टक्क्यांवरून शून्य झाले आहे.” महासत्ता राहण्यासाठी अमेरिकेला भारतीय डेटाची आवश्यकता आहे.
अमेरिकेने भारताला पाकिस्तानच्या बरोबरीने लेखू नये
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले की, आपली ऊर्जा सुरक्षा ही सर्वोपरि आहे आणि ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत वाचवू. ट्रम्प यांना त्यांच्या शेतकऱ्यांचे हित पाहायचे आहे, पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे वाटते. अमेरिकेने भारताला पाकिस्तानच्या बरोबरीने लेखू नये. जर, ट्रम्प पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत नाश्ता करत असतील, तर भारताने त्यावर आपली भूमिका स्पष्ट मांडायला हवी.
तर आम्ही स्पष्ट केले असते की आम्ही तुमचे मित्र आहोत पण…
राहुल गांधींनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संदेश दिला. “जर इंडिया आघाडीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असती, तर आम्ही स्पष्ट केले असते की, आम्ही तुमचे मित्र आहोत, पण नोकर नाही. आम्ही त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने बोललो असतो. ट्रम्प यांना जर भारतीय डेटाचा ॲक्सेस हवा असेल, तर त्यांनी आमच्याशी सन्मानाने वागले पाहिजे,” असे राहुल गांधी ठणकावून म्हणाले.
आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचे हे अमेरिका ठरवेल का? राहुल म्हणाले, जर अमेरिकन लोकांना महासत्ता राहून त्यांच्या डॉलरचे रक्षण करायचे असेल, तर भारतीय डेटा महत्त्वाचा आहे. आपली लोकसंख्या ही एक ताकद आहे, पण जर तुम्हाला माहिती असेल की डेटा किती महत्त्वाचा आहे. जर भारतीय गट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करत असेल, तर आम्ही असे म्हटले असते की या करारात भारतीय डेटा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.





