नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठक झाली असून, यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि करार झाले आहेत. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला मोदींनी संबोधले. तेव्हा, पत्रकाराने अदानी प्रकरणावरून प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान मोदींनी अशा खासगी मुद्द्यासाठी दोन देशांचे प्रमुख बसत, बोलत नाहीत, म्हणून अधिक बोलणे टाळले. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये उभय देशांतील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. बैठकीनंतर मोदी-ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकाराने अदानी प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला.
यावेळी उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारण्यात आले होते. याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे, आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे असे मला वाटते. दोन देशांचे दोन सर्वोच्च नेते कधीही अशा वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत.”
काय म्हणाले राहुल गांधी?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “देशात प्रश्न विचारला की मौन, परदेशात प्रश्न विचारला की, खासगी मुद्दा. अमेरिकेमध्ये मोदीजींनी अदानीजींच्या भ्रष्टाचार प्रकरणावर पडदा टाकला.” “जेव्हा मित्राचा खिसा भरणे मोदीजींसाठी राष्ट्र निर्माण आहे. तेव्हा लाचखोरी आणि देशाची संपत्ती लुटणे व्यक्तिगत प्रकरण बनतो”, असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला.
गौतम अदाणींवर अमेरिकेत काय आरोप?
२०२४ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या खटल्यात गौतम अदाणी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सौरऊर्जेच्या करारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी अदाणी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २,१०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केले आहे. हे व्यवहार अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवण्यात आले होते ज्यांच्याकडून अदाणी समूहाने अब्जावधी डॉलर्स उभारले आहेत.
ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी, एका कार्यकारी आदेशाद्वारे न्याय विभागाला अदाणी समूहाची चौकशी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ अर्धशतक जुन्या कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.