मुंबई । Mumbai
महाराष्ट्रात महायुतीची सत्तास्थापना झाल्यानंतर सध्या विधानसभेचे कामकाज सुरु आहे. मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारी ७ डिसेंबर आणि रविवारी ८ डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला.
यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. अखेर भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच विरोधकांचे देखील देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज विरोधी पक्षाचेही आभार मानतो की राहुल नार्वेकर यांच्या निवडीला पूर्ण समर्थन दिलं. विरोधी पक्षातल्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी आभार मानतो. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहिली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
तसंच ते पुढे म्हणाले, अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं तरीही आपण परत आलात याचा मला आनंद आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्यात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री होते तेव्हा त्या तिघांमधला एक वकील होता. आता तुमच्या रुपाने आणखी वकील विधानसभेत आहे. राहुल नार्वेकर हे पहिलेच अध्यक्ष असतील पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष झाले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते अध्यक्ष झाले. नाना पटोलेंचे विशेष आभार कारण त्यांनी वाट मोकळी केल्याने ते अध्यक्ष झाले. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.