Saturday, June 20, 2026
HomeनगरRahuri : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 31 अर्जांची विक्री

Rahuri : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 31 अर्जांची विक्री

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

223- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून काल, सोमवारपासून उमेदवारी अर्ज विक्री करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 6 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून 9 एप्रिल ही माघारीची अंतिम मुदत असेल. 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

- Advertisement -

अर्ज प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी उत्सुकता मोठ्या प्रमाणात दिसून आली. दुपारी 3 वाजेपर्यंत तब्बल 15 इच्छुक उमेदवारांनी एकूण 31 अर्ज खरेदी केले आहेत. यावरून निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उमेदवारी अर्ज विक्रीची सुरुवात होताच राहुरीच्या राजकीय वातावरणात चांगलीच रंगत सुरू झाली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन, बैठका, गावभेटी आणि मतदार संपर्क मोहिमा वेगाने सुरू आहेत.

सध्या माजीमंत्री प्राजक्त तनपुरे आणि युवा नेते अक्षय कर्डिले ही दोन नावे विशेष चर्चेत आहेत. दोन्ही गटांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. मात्र, भाजपाची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार यावरच खर्‍या अर्थाने राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेषतः पक्षाकडून दिला जाणारा ‘एबी फॉर्म’ कोणाच्या हाती पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू राहणार असून बंडखोरीची शक्यता देखील नाकारता येत नाही.

6 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने शेवटच्या काही दिवसांत उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रमुख पक्षांसोबतच अपक्ष, नाराज नेते आणि लहान पक्षांचे उमेदवारही रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. सध्या गावोगावी चावड्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत पोटनिवडणुकीचीच चर्चा रंगली आहे. सहानुभूतीची लाट, विकासाचे मुद्दे, स्थानिक नेतृत्व आणि पक्षीय समीकरणे यांचा निकालावर मोठा प्रभाव पडणार असल्याने राहुरीची ही लढत अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : विजेच्या धक्क्याने मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

0
वणी | प्रतिनिधी वणी येथे लग्नाचा मंडप सोडण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा मंडप सोडताना लोखंडी पाईप वरून गेलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू...