राहुरी । प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भाग असणाऱ्या म्हैसगाव येथील शशिकांत विधाटे हे कामावरून घरी जात असताना चार अज्ञात चोरट्यांनी त्यांना घोरपडवाडी घाटात अडवून त्यांच्याकडून जवळपास ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत श्रीरंग विधाटे (वय ३५, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) हे राहुरी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या डॉ. खुरूद हॉस्पिटल येथे काम करतात. हॉस्पिटलचे काम आवरल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात असताना घोरपडवाडी येथील घाटात त्यांच्या जवळ असलेल्या इलेक्ट्रिक स्कुटीने जात असताना घाटात स्कुटीचा वेग कमी झाला.
त्याचदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीवरील चार अज्ञात व्यक्ती गाडीवरून उतरून त्यांच्या पोटाला गावठी कट्टा लावुन त्यांना मारहाण करण्यात आली. याच दरम्यान विधाटे यांच्या खिशातील रोख रक्कम २१,५०० व मोबाईल तसेच चांदीची अंगठी असा जवळपास ३० हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
यावेळी विधाटे यांची इलेक्ट्रिक स्कुटीही नेण्याचा प्रयत्न केला, मात्र चार्जिंग कमी असल्याने स्कुटी नेण्याचा डाव फसला, असल्याचे शशिकांत विधाटे यांनी सांगितले आहे. संबंधित घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजले आहे.