राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
223-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे हा मतदारसंघ रिक्त झाला असून, लवकरच येथे पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अन्वये 223-राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
या कार्यक्रमात दि. 1 जानेवारी 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, या तारखेनुसार मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. याअंतर्गत प्रथम टप्प्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण दि. 29 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 3 जानेवारी 2026 रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन करण्यात येईल.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना दावे व हरकती सादर करण्याची संधी देण्यात आली असून, हा कालावधी दि. 3 जानेवारी 2026 ते दि. 24 जानेवारी 2026 असा राहणार आहे. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छाननी करून त्यांचा निकाल दि. 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत लावण्यात येणार आहे.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 223-राहुरी विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, तसेच आवश्यक दुरुस्त्या करून घेण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




