अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुंबई, पुण्यासह जिल्ह्याच्या घाटमाथा आणि धरणाच्या पाणलोटात धो धो बरसणार्या पावसाने नगर जिल्ह्यात पाच तालुक्यांत पाठ फिरवलेली दिसत आहे. यात सर्वात बिकट अवस्था राहुरी तालुक्याची असून निम्मा पावसाळा संपला तरी या ठिकाणी आतापर्यंत पडणार्या एकूण पावसाच्या सरासरीच्या 45.3 टक्के पाऊस झालेला आहे. यासह श्रीरामपूर, राहाता, शेवगाव-पाथर्डीत पावसाची स्थिती नाजूक असून आता परतीच्या पावसावर सर्व भिस्त अवलंबून राहणार आहे.
दरम्यान जिल्ह्यात काही तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून अकोले, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात सरासरीच्या 180 ते 130 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असल्याने जिल्ह्यातील एकूण पावसाची सरासरी 102 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत पाऊस कोसळत असतो. या काळात पडणार्या पावसाच्या सरासरीवर जिल्ह्यातील पावसाचा कमी-जास्तचा अंदाज मोजण्यात येतो. जिल्ह्यात 14 तालुक्यांत आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा सरासरीच्या 188 टक्के पाऊस अकोले, 133 टक्के श्रीगोंदा तालुक्यात झालेला आहे. त्याखालोखाल कर्जत तालुक्यात 131 टक्के पाऊस झालेला आहे. तर पारनेर तालुक्यात 117, कोपरगाव तालुक्यात 115 टक्के पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झालेली आहे. सर्वात कमी पाऊस राहुरी तालुक्यात असून त्यानंतर श्रीरामपूर, राहाता, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात आहे.
तालुकानिहाय पाऊस (आकडे टक्केवारी)
नगर 91.7, पारनेर 117.7, श्रीगोंदा 133.1, कर्जत 131.6, जामखेड 94.3, शेवगाव 68.1, पाथर्डी 69.7, नेवासा 71.5, राहुरी 45.3, संगमनेर 113. 8, अकोले 188.1, कोपरगाव 115, श्रीरामपूर 56, राहाता 79.3 एकूण 102.5 टक्के पाऊस झालेला आहे.




