Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरीच्या ट्रक चालकास चास शिवारात लुटले

राहुरीच्या ट्रक चालकास चास शिवारात लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहुरी फॅक्टरी येथील एका ट्रक चालकास चास (ता. नगर) शिवारात लुटले. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान लुटमार करणार्‍या चौघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात दोन अल्पवयीन मुले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

अक्षय राजेंद्र साळवे व आकाश सुभाष सोलट (दोघे रा. सारोळा कासार ता. नगर) व सारोळा कासार येथील दोन अल्पवयीन मुले यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नानासाहेब सोपान शिंदे (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) हे त्यांच्याकडील ट्रकमध्ये माल घेवुन पुणे येथे खाली करण्यासाठी जात असताना मध्यरात्री चास शिवारात त्यांना चौघांनी अडविले. त्यांना दमदाटी करत त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला. दरम्यान सदरची घटना काही स्थानिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ 112 नंबरवर फोन केला.

नगर तालुका पोलिसांच्या गस्ती पथकावर असलेले पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांना देण्यात आली. त्यांनी पोलीस अंमलदार योगेश ठाणगे, देवा काळे, इथापे, राहुल शिंदे, थोरात, राजू खेडकर, गायत्री धनवडे यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालक शिंदे ट्रक घेवुन पुण्याकडे रवाना झाले होते. दरम्यान चास शिवारातील एका हॉटेलजवळ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह सोलट व साळवे यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली आहे.

पिकअप चालकास लुटल्याची कबूली

16 जून, 2022 रोजी पिकअप खराब झाल्याने चास शिवारात थांबलेले लक्ष्मण राजू रसाळ (रा. हडपसर, पुणे) यांना तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले होते. त्यांच्याकडून 27 हजार 500 रूपये, मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी रसाळ यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आकाश सोलट, अक्षय साळवे व एक अल्पवयीन मुलाने सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी दोघांना या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांच्याकडून 27 हजार 500 रोख रक्कम, दुचाकी, दोन मोबाईल, एक लोखंडी चॉपर असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान अटक केलेल्या दोघांना बुधवारी दुपारनंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या