Tuesday, June 16, 2026
Homeमहाराष्ट्रRaigad News : काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वत:सह चार मुलांना पाजले...

Raigad News : काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वत:सह चार मुलांना पाजले विष, तिघांचा मृत्यू

रायगड । Raigad

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून हृदय हेलावून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोटच्या चार निष्पाप मुलांना थंडपेयातून विष पाजल्यानंतर एका हतबल आईने स्वतःही विष प्राशन करून आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना खरवली आदिवासी वाडी येथे घडली आहे. या भीषण घटनेत आईसह तिच्या दोन चिमुरड्या मुलींचा वेदनादायक मृत्यू झाला असून, दोन चिमुकले सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे राहणाऱ्या आशा जाधव (वय २९) यांनी शुक्रवारी रात्री हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आपल्या चार मुलांना आधी शीतपेयातून विषारी पदार्थ मिसळून दिला आणि त्यानंतर स्वतःही त्याचे प्राशन केले. काही वेळाने घरातून मुलांचा रडण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि विष संपूर्ण शरीरात पसरले होते.

या भीषण घटनेत आशा जाधव यांच्यासह त्यांची सात वर्षांची मुलगी नंदिनी जाधव आणि सहा वर्षांची मुलगी दुर्वा जाधव यांचा जागीच किंवा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. खेळण्या-बागडण्याच्या वयातच या दोन चिमुरड्यांचा अंत झाल्याने उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते. तर दुसरीकडे, अन्य दोन मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही बालकांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने सुरू केला आहे. एका सुशिक्षित आणि तरुण मातेने आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्यासारखा टोकाचा निर्णय का घेतला? यामागचे गूढ अद्याप उकललेले नाही. कौटुंबिक कलह, तीव्र आर्थिक टंचाई किंवा इतर कोणतीही मानसिक विवंचना या कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, अशा सर्व बाजूंनी पोलीस सध्या तपास करत आहेत. मात्र, अद्याप कोणतेही ठोस आणि अधिकृत कारण समोर आलेले नाही.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...