Sunday, November 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashikroad Railway Station : रेल्वे प्रवाशांवर आता ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर; टीसींना बॉडी...

Nashikroad Railway Station : रेल्वे प्रवाशांवर आता ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर; टीसींना बॉडी कॅमेरे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

रेल्वे प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासह तिकीट तपासणी करताना तिकीट तपासनीस (टीसी) आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद, आरोप-प्रत्यारोप यांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवा उपक्रम हाती घेतला आहे. यापुढे टीसींच्या गणवेशावर बॉडी कॅमेरे लावण्यात येणार असून, तिकीट तपासणीची संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्याच्या नजरेखाली राहणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि टीसी या दोघांच्याही वर्तनावर नियंत्रण राहण्यास मदत होणार आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या १७ टीसींना रेल्वे प्रशासनाकडून हे कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. टीसींच्या आठ तासांच्या ड्युटीदरम्यान हे कॅमेरे कार्यरत राहणार आहेत. तिकीट तपासणी करताना प्रवाशांकडून होणारे आरोप, गैरसमज तसेच महिला प्रवाशांशी संबंधित तक्रारींच्या प्रसंगी प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे चित्रीकरण उपलब्ध होणार आहे.

अनेकदा तिकीट तपासणीदरम्यान टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होतात. काही प्रसंगी विशेषतः महिला प्रवाशांकडून टीसींवर गैरवर्तनाचे आरोप केले जातात, तर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडूनही तपासणीदरम्यान वाद घातले जातात. अशा घटनांमध्ये नेमकी वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी बॉडी कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण महत्त्वाचा पुरावा ठरू शकते.

या उपक्रमामुळे तिकीट तपासणी अधिक पारदर्शक होण्याबरोबरच टीसींच्या कामकाजाला सुरक्षितता मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कॅमेऱ्यांमुळे प्रवाशांशी संवाद साधताना अधिक जबाबदारीने वागण्यासही मदत होणार असून, रेल्वे प्रवासातील शिस्त राखण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : वाहनांतून डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांकडून पर्दाफाश

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon कोपरगाव शहर व परिसरात वाहनांमधून डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येवला नाका परिसरात रात्रीच्या वेळी...