Friday, May 3, 2024
Homeनाशिकउत्तर महाराष्ट्रातील रेल्वे समस्या कायम

उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे समस्या कायम

नाशिकरोड । Nashikroad (प्रतिनिधी)

नाशिकची लाईफलाईन असलेल्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये मासिक पास आणि पासधारकांचा डबा त्वरित सुरु करा. मनमाड-कसारा मेमो आणि नाशिक-कल्याण लोकलची चाचणी तातडीने घ्या. भुसावळ-नाशिक-पुणे एक्सप्रेस पुन्हा सुरु करा, गोदावरी बंद करु नका आदी मागण्या रेल्वे प्रवाशांनी केल्या आहेत.

- Advertisement -

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल 15 जानेवारील नाशिक, देवळाली, मनमाड, भुसावळच्या दौर्‍यावर येऊन गेले. मात्र, त्यांनी प्रवाशांच्या तोंडाला पाणेच पुसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.ते नाशिककरांना न्याय देतील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे.

लॉकडाउनपासून पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या इंटरसिटी ट्रेन बंद आहेत. त्या फक्त स्पेशल नावाने सुरु ठेवल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. पंचवटीतून मुंबईला रोज अप-डाऊन करणार्‍या नोकरदार, व्यावसायिकांचा मासिक पास बंद आहे. कोविडमुळे त्यांना जाताना दीड आणि येताना दीड असे तीन तास आधी स्थानकात हजर रहावे लागते.

रोज रिझर्व्हेशन करावे लागते. जास्त वेळ व पैसा खर्ची पडून दगदग वाढल्याने नाशिककर नोकरदार महिला प्रवासी मुंबईत नातेवाईकांकडेच मुक्काम ठोकतात. रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब केदारे व अन्य नोकरदार तर मुंबईतील कार्यालयातच राहून रविवारीच नाशिकला येतात. मासिक पासधारकांना सवलत दिल्यास या समस्या सुटतील.

कसार्‍यातून सामान्यांसाठी लोकल बंद असल्याने असंख्य टॅक्सीचालक बेरोजगार झाले आहेत. लोकल सुरु केल्यास त्यांना रोजगार मिळेल आणि नोकरदारांना मुंबईला जाण्यासाठी पर्याय मिळेल.

गोदावरी बंद केली का?

पंचवटीप्रमाणचे गोदावरी ही नाशिकची फॅमिली ट्रेन आहे. प्रवासी संख्या कमी झाल्याचे कारण देत ती अचानक बंद केल्याने धक्काच बसला आहे. ही गाडी त्वरित सुरु करण्याची मागणी आहे. पुण्याला जाण्यासाठी स्वस्त आणि मस्त भुसावळ-नाशिक-पुणे एक्सप्रेस स्थगित असल्याने नाशिककरांना रस्तामार्गे जास्त वेळ, पैसा खर्चून, वाहतुककोंडी, प्रदूषणाला सामोरे जात पुणे गाठावे लागते.

त्यामुळे ही गाडी पुन्हा सुरु करण्याची मागणी आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला नाशिक-पुणे रेल्वेमार्ग कागदोपत्रीच आहे. तो युध्दपातळीवर प्रत्यक्षात आणावा. भुसावळ-मुंबई आणि देवळाली-भुसावळ पॅसेंजर सुरु नसल्याने नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारकरांचे हाल होत आहेत.

आरक्षण कार्यालय

नाशिकरोड रेल्वेस्थानकातील आरक्षण कार्यालय सिन्नरफाटा येथे गेल्याने अपंग, वृध्द, महिलांचे हाल होत आहेत. त्यामुळे जुने कार्यालयदेखील सुरु ठेवण्याची मागणी आहे. सिन्नरफाटा येथे गुंडगिरी, जुगार, अवैध धंदे सुरु असल्याने प्रवाशांना रात्री जाता येत नाही.

त्यामुळे तेथे आरपीएफची किंवा रेल्वे पोलिसांची चौकी करावी, गस्त वाढवावी. पार्सल कार्यालयामुळे देवी चौकातील वाहूतकीला अडथळा येतो. ते सिन्नरफाट्याकडे नेल्यास पार्सलची वाहने बाहेरुनच जाऊन कोंडी टळेल. रेल्वे पोलिसांना निवासस्थाने तसेच प्रशस्त कार्यालयाची गरज आहे.

सरकारी नोकर, अत्यावश्यक सेवेतील सेवकांसाठी तरी पंचवटीचा मासिक पास, पासधारकांचे डबे सुरू करा. गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरू करा. नाशिक-कल्याण लोकल आणि मनमाड-कसारा मेमूची चाचणी त्वरित घ्या. भुसावळ-नाशिक-पुणे गाडी, नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे काम सुरु करावे.

राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या