Friday, May 3, 2024
Homeनगरभिज पावसामुळे पिकांना संजीवनी

भिज पावसामुळे पिकांना संजीवनी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी रात्री उशीरापासून भिज पावसाला सुरूवात झाली आहे. गुरूवारी दिवसभर दक्षिणेसह नगर शहरात अधून-मधून भिज पाऊस पडत होता. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मका यासह चारा पिकांना तात्पुरती का होईना संजीवनी मिळाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात जवळपास ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड होता. यामुळे खरीप हंगामात 6 लाख 63 हजार हेक्टरवरील पिकांची स्थिती बिकट झाली होती. पेरणी झालेल्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांच्या उत्पादकतेत 50 ते 95 टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. खरीप हंगामातील मूग, उडिद आणि अन्य कडधान्य पिकांचा विषय मागील महिन्यांत संपलेला असून या पिकांना आता कितीही पाऊस झाल्यास फायदा होणार नाही. उलट ज्या कडधान्य पिकांना शेंगा आलेल्या आहेत. त्यांचे नुकसान आता होणार्‍या पावसामुळे होणार आहे.

दरम्यान, यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशी, तूर आणि मका पिकांची पेरणी अथवा लागवड झालेली आहे. या पिकांना गेल्या 15 दिवसांपासून पाण्याची गरज होती. दोन दिवसांपासून भिज पावसाला सुरूवात झाल्याने या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून विशेष करून सोयाबीन आणि तूर पिकांना या भिज पावसामुळे संजीवनी मिळणार असली जिल्ह्यात सर्वदूर मोठ्या पावसाची गरज आहे.

आता गणपतीकडे शेतकर्‍यांचे लक्ष

जिल्ह्यात भिज पावसाला का होईना पावसाला सुरूवात झाली आहे. 19 तारखेपासून गणपतीबाप्पा यांचे आगमन होणार आहे. बप्पांच्या दहा दिवसांच्या कालावधीत पावसाने बरसावे, अशी अपेक्षा आतापासून बळीराजा करत आहे. जिल्ह्यात हा कालावधी परतीच्या मान्सूनचा असून परतीचा मान्सूनवर जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे चित्र अवलंबून राहणार आहे.

आज यलो अर्लट

नगर जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने आज शुक्रवार (दि.7) रोजी नगर जिल्ह्यात पावसाचा यलो अर्लट जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार जिल्ह्यात पाऊस झाल्यास शेतकर्‍यांना आणि पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, गुरूवारी जिल्ह्यात 14 तालुक्यात सरासरी 15. 8 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यात नगर, पारनेर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील भिज पावसाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या