Friday, May 3, 2024
Homeनाशिकसातपूर पोलीस ठाण्यात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’

सातपूर पोलीस ठाण्यात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’

सातपूर । प्रतिनिधी Satpur

शारीरिक सक्षमता व करोनापासून बचावासाठी जशी ऑक्सिजनची लेव्हल तपासावी लागते तसेच सगळ्याला आवश्यक असणार्‍या पाण्याची पातळी सांभाळण्यासाठी जलसंवर्धन करणे गरजेचे आहे. शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये बोअरवेल आहेत, काही ठाण्यांच्या आवारात विहिरी आहेत. त्या सर्व ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाच्या माध्यमातून जलसंवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

सातपूर पोलीस ठाण्याच्या आवारात जिंजर हॉटेलच्या पाठबळावर व नमामी फाऊंडेशनच्या पुढाकाराने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आला. याद्वारे पोलीस ठाण्याच्या इमारत परिसरात पडणारे पावसाचे पाणी पाईपलाईनद्वारे बोअरवेलमध्ये सोडण्यात आले असून जलपरीच्या माध्यमातून पाणी टाकीत सोडून त्याचा वापर केला जाणार आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी अभिनेते चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव, निनाद वाघ, नमामी फाऊंडेशनचे राजेश पंडित, मयूर मोरे, पूर्वा सावजी, अपूर्व जाखडी, शीतल गायकवाड, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अशोक नखाते, व.पो.नि. राकेश हांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याचे स्पष्ट करताना शहरातील प्रत्येक नागरिकांनी पाण्याची पातळी वर आणण्यासाठी जलसंवर्धन करण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी टाटा ग्रुपच्या हॉटेल जिंजरच्या माध्यमातून मोलाची मदत मिळाली असून नमामी फाऊंडेशनच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याचे चिन्मय उदगीरकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन पौर्णिमा चौगुले यांनी तर आभार राकेश हांडे यांनी मानले. यावेळी पोलीस अधिकारी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या