मुंबई | Mumbai
राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. याचदरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी दुबार मतदान नोंदणी आणि मतदार यादीसंदर्भाने आयुक्तांना प्रश्न विचारले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर आयुक्त वाघमारे यांना देता आले नाही. यानंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याच पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
आजच्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन…
पत्रकार परिषदेत निवडणुक आयुक्त काय उत्तर देतात?
पत्रकार परिषदेदरम्यान आयुक्तांना सुलभ शौचालय आणि आयुक्तांच्या घराच्या नावे असणाऱ्या यादीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. ते म्हणाले, “मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा ही वेगळी आहे. आम्ही फक्त ती यादी वापरतो. एक तारीख ठरवतो आणि त्या दिवसाची यादी मतदानाला ग्राह्य धरतो. त्याची शहानिशाही आम्हीच करतो. दुबार मतदार असतील किंवा चुकीच्या प्रभागात नाव गेले असल्यास ते तपासतो. ज्यांची नावे ही आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होती, पण आताच्या यादीत नसतील तर त्या नावांचा समावेश करतो. काही लहान-सहान दोष असतील तर ते दुरुस्त करतो.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





