Friday, January 23, 2026
HomeराजकीयRaj Thackeray : ही कोणती प्रथा, कोणता नियम…; राज ठाकरे निवडणूक आयोगावर...

Raj Thackeray : ही कोणती प्रथा, कोणता नियम…; राज ठाकरे निवडणूक आयोगावर का संतापले?

मुंबई । Mumbai

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला अनुकूल ठरेल अशा पद्धतीने काम करत असल्याचा थेट आरोप करत, त्यांनी ‘पाडू’ (PADU) यंत्रणेच्या वापराबाबत तीव्र शंका व्यक्त केली आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आले असताना राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या बदलत्या नियमांवर जोरदार टीका केली. सामान्यतः प्रचार संपल्यानंतरचा दिवस हा ‘सायलेन्स पिरीयड’ म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये कोणताही प्रचार किंवा भेटीगाठी होत नाहीत. मात्र, यंदा निवडणूक आयोगाने प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांना भेटण्याची परवानगी दिली आहे, पण पत्रके वाटण्यास मनाई केली आहे.

YouTube video player

या नियमावर बोट ठेवत राज ठाकरे म्हणाले की, “असा नियम कशासाठी करण्यात आला आहे? पत्रके वाटायची नाहीत पण भेटायचे, याचा अर्थ तुम्ही छुप्या पद्धतीने पैसे वाटण्यास मुभा देत आहात का?” असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला. हा नियम लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत का नव्हता आणि केवळ मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीच का लागू केला जात आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मतमोजणी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास वापरल्या जाणाऱ्या ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्रणेवर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला आहे. ही यंत्रणा नेमकी काय आहे आणि ती कशी कार्य करते, याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाला माहिती देण्यात आलेली नाही. “निवडणूक आयोगाने हे मशीन कोणालाही दाखवलेले नाही. यामध्ये मतदानाची फेरफार होणार नाही याची शाश्वती कोण देणार?” असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही या यंत्रणेबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे, परंतु अद्याप आयोगाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

राज्यात सध्या ‘बेबंदशाही’ सुरू असल्याची टीका करत राज ठाकरे यांनी मनसैनिक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोग सरकारला हवं तसं काम करून देत असल्याचा आरोप करत त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या प्रभागात आणि मतदान केंद्रावर (बूथ) अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे यांच्या या आरोपांमुळे निवडणुकीच्या ऐन तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोग आता या आरोपांवर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...