मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही पक्षातील नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे या चर्चांना आणखीनच धार मिळाली आहे. त्याचवेळी राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्यासंदर्भात जाहीर केलेल्या त्रिभाषा सूत्रालाही मोठा विरोध होऊ लागला. त्याविरोधात येत्या ५ जुलैला राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती लवकरच प्रत्यक्षात होईल असे तर्क सुरू झाले आहेत. यासंदर्भात सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये खुद्द राज ठाकरेंनी यासंदर्भात भाष्य केले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गट आणि मनसे नेत्यांची पडद्याआडून चर्चा सुरू आहे. त्यावरून युतीच्या चर्चा सुरू आहेत.
युत्या आघाड्या गोष्टी येत जात राहतील
“मोर्चाला पक्षीय लेबल लावून नका. विजयी मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नका. कस आहे, युत्या, आघाड्या या सगळ्या गोष्टी येत जात राहतील. मराठी भाषा संपली परत नाही येणार. कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या भाषाच मुळाशी गेली तर या युत्या, आघाड्यांना काय अर्थ आहे?” असा प्रतीप्रश्न राज यांनी पत्रकारांना विचारला. “या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीच्या वेळी विचार करता येईल. त्याचा आता विचार करुन चालणार नाही. या गोष्टीकडे तुम्ही संकट म्हणूनच पहावे. त्याला राजकीय लेबले लावू नयेत,” असेही राज यांनी म्हटले.
अजित पवारांचा हिंदी सक्तीला विरोध
हिंदी सक्तीला विरोध करण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनीही विरोध केल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. “राज्य सरकारमधल्या अनेक मंत्री-आमदारांनीही हिंदी सक्तीला विरोध केला. अजित पवारांनीही विरोध केला आहे”, असे ते म्हणाले. तसेच, या मुद्द्यावर राज्य सरकारने कुणीचीही समिती नेमली, तरी आमची भूमिका कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले.
जाधव येऊ देत किंवा इतर कोणी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शासन आदेश रद्द केल्याची घोषणा केली. त्यावेळी एकूणच त्रिभाषा सूत्रासंदर्भात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करीत असल्याची घोषणा त्यांनी केल्याचा संदर्भ देत राज यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी, “आमची भूमिका स्पष्ट आहे. पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. जाधव येऊ देत किंवा इतर कोणी येऊ देत,” असे म्हटले.
सर्व पक्षीय आमदारांना आवाहन
आमदारांनीही आता या विषयावर अधिवेशनात चर्चा करून वेळ वाया घालवू नये, महाराष्ट्रातल्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करावी. जीआर रद्द झाला आहे. आता इतर विषयांवर बोलावे. शिक्षणात अनेक त्रुटी आहेत. शाळा नाहीयेत. शिक्षकांना पगार नाहीयेत. अशा इतर अनेक विषयांना हात घालावा”, असे आवाहन राज ठाकरेंनी सर्वपक्षीय आमदारांना केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





