मुंबई । Mumbai
राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (रविवार) आपल्या कुटुंबीयांसह ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत.
राज ठाकरे यांची मागील तीन महिन्यांत मातोश्रीवरील ही तिसरी भेट आहे. यापूर्वी, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर राज आणि शर्मिला ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे युती आणि आघाडीच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे.
मातोश्रीवर जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी त्यांच्यासोबत आई असल्याची माहिती दिली. त्यामुळे ही भेट राजकीय नसून कौटुंबिक आहे, असे सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मावशींच्या सुचनेवरून उद्धव हे शिवतीर्थावर गेल्याची माहिती समोर आली.
केवळ राज ठाकरेच नाही, तर यापूर्वी गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे यांनीही अचानकपणे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी देखील ती भेट कौटुंबिक असल्याचे सांगण्यात आले होते. राज यांच्या आईंच्या (उद्धव यांच्या मावशी) सूचनेनुसार उद्धव ठाकरे ‘शिवतीर्था’वर गेल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती. दोन्ही कुटुंबांतील वाढलेला स्नेह आणि भेटीगाठी पाहता, मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून सुरू असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये आगामी निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिका (BMC) आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती किंवा आघाडीच्या समीकरणांवर चर्चा होण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
भाजप आणि सध्याच्या सत्ताधारी महायुतीविरोधात एकी साधण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. जर ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हे मराठी मतांचे विभाजन टळले आणि दोन्ही ठाकरे एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा मोठा आणि निर्णायक परिणाम होऊ शकतो. या डिनर डिप्लोमसीनंतर दोन्ही ठाकरे गट एकत्र येऊन महाविकास आघाडीसोबत (MVA) नवीन राजकीय समीकरण तयार करतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





