Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रराजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव; 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारणार

राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव; 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारणार

मुंबई । Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात एक मोठे बदल होणार असून, राजेश अग्रवाल (IAS) यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर, १ डिसेंबरपासून १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले राजेश अग्रवाल हे मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतील.

राजेश अग्रवाल यांच्याकडे प्रशासनाचा दीर्घ आणि प्रभावी अनुभव आहे. केंद्र सरकारमध्ये ते यापूर्वी दिव्यांग खात्याचे सचिव म्हणून कार्यरत होते. आधुनिक तंत्रज्ञान, वित्तीय सुधारणा आणि सामाजिक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे त्यांची गणना देशातील प्रगतिशील प्रशासकांमध्ये केली जाते. अग्रवाल यांनी आयआयटी दिल्लीतून बी.टेक (संगणक विज्ञान) पदवी घेतली आहे. प्रशासकीय सेवेत असतानाही त्यांनी शासन व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर सातत्याने भर दिला आहे.

आधार, जनधन आणि डिजिलॉकर सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांवर त्यांनी केंद्रात काम केले आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला बळ देण्यात त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण मानला जातो. सामाजिक न्यायाच्या उपक्रमांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्तीनंतर अग्रवाल यांनी विविध महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. अकोला आणि जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली. मुंबई महानगरपालिकेत डेप्युटी कमिशनर असताना त्यांनी शहरी व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्प यशस्वीपणे राबवले.

राज्याच्या वित्त विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागात त्यांनी धोरणात्मक निर्णय, आर्थिक शिस्त आणि डिजिटल प्रशासनाला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित केले. राज्याच्या मुख्य सचिवपदी येण्यापूर्वी ते भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे (DEPwD) सचिव होते. दिव्यांग नागरिकांसाठी धोरणे आणि सुविधा प्रभावीपणे राबवण्याच्या त्यांच्या कामाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे.

अग्रवाल यांची तंत्रज्ञानाभिमुख विचारसरणी, जमिनीवरची कार्यशैली आणि केंद्र-राज्य पातळीवरील अनुभव यामुळे महाराष्ट्र प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल प्रशासन, पारदर्शकता आणि कार्यक्षम गव्हर्नन्सला चालना मिळून राज्याच्या विकासयात्रेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांची नियुक्ती ३० जून २०२५ रोजी करण्यात आली होती आणि त्यांचा कार्यकाळ आता ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर अगरवाल मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारतील. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीवर राजेश अगरवाल यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय स्तरावर मोठी उत्साहाची लहर आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...