नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
अशोक खरात नामे या कथित ज्योतिषीने केलेले कांड एवढे भयंकर आहे की ज्योतिष हे शास्र असल्याचा दावा करणारेही गर्भगळीत झाले असतील. अमेरिकेतील एपस्टीन फाईल्सने जगभर खळबळ माजविलेली असतानाच त्याचेच हे देशी रूप असल्याचे म्हणावे लागेल. देश व राज्य पातळीवरील बड्या नेत्यांचे खरातशी असलेले संबंध ही तर अधिक चिंताजनक बाब.
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड|
काय त्यास रांड प्रसविली॥
कुंकवाची ठेवावी बोकडादेवी कशाला|
तुका म्हणे रांडे लेका, अंती जाशील यमलोका॥
गाढव शृंगारिले कोडे|
काही केल्या नव्हे घोडे॥
तुका म्हणे ऐशा नरा|
मोजून माराव्या पैजारा॥
जेथे जेथे दंभ, दुटप्पीपणा, खोटेपणा आहे अशा सगळ्याच ठिकाणी संत तुकारामांनी आपल्या अभंगातून कडाडून हल्ला केला, तोदेखील चारशे वर्षांपूर्वी. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन लिंगपिसाट सैतान बनलेल्या एका हायप्रोफाईल तथाकथित कॅप्टनचा झालेला पर्दाफाश. अशोक खरात नामे या कथित ज्योतिषीने गेल्या काही वर्षांत एवढे कांड केले आहे की ज्योतिष हे शास्त्र असल्याचा दावा करणारेही आज गर्भगळीत झाले असतील. अमेरिकेतील एपस्टीन फाईलने जगभर खळबळ माजविलेली असतानाच त्याचे देशी; परंतु अत्यंत हिडीस प्रारूप म्हणून या प्रकरणात पुढे येत असलेल्या चित्रफिती आणि माहिती पाहून वाटते.
एका महिलेचे शोषण केल्याबद्दल खरातवर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेली असली तरी पाठोपाठ त्याच्या सर्वगामी वासनांना बळी पडलेल्यांची यादी वाढतच चालली आहे. अजूनही असंख्य लोक गप्प आहेत. अशा सर्वच पीडितांनी पुढे यायचे ठरविले तर कदाचित एपस्टीनदेखील फिका पडेल. सध्या सगळ्याच प्रकारच्या माध्यमांमध्ये या खरातचे कारनामे उघड होत असल्याने अशा नरांना मोजून पैजारा मारण्याचा जो उपदेश तुकारामांनी सांगितला आहे, तो पोलिसांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात तपशिलाने अंमलात आणला असेलच. पण त्यातील नर हा शब्द महत्त्वाचा. खरातचे उद्योग ऐकल्यानंतर त्याच्या दृष्टीने नर आणि मादी एवढीच काय ती मानव जात असावी. एका अर्थाने तो आजही आदिम जगात वावरत असावा.
गावभर व्हायरल झालेली चित्रफित पाहिल्यानंतर लैंगिकतेची परिसीमा गाठणार्यांनाही शिसारी यावी. शेकडो लोकांच्या श्रद्धेचा असा गैरफायदा घेताना ज्या माणसाला जनाची तर नाहीच पण मनाचीही काहीच वाटली नाही. तुका म्हणे रांडे लेका, अंती जाशील यमलोका, या कवनात महाराज फार संयमाने असल्या दांभिकांना यमलोकात जाल, असा इशारा देतात. खरातने तर आपल्या करणीने साक्षात पृथ्वीवरच यमलोक साकारला. अजून तर खरातच्या कारनाम्यांच्या हिमनगाचे टोकच वर आले आहे. पोलिसांना प्रशासनाने प्रामाणिकपणे काम करू दिले, त्यात कोणताही सरकारी हस्तक्षेप केला नाही तर हा हिमनग किती विशाल आहे आणि त्याच्या पोटात किती किंकाळ्या, वेदना, आर्तता दडल्या आहेत हे कळू शकेल. खरातचा वावर ज्या थरात होता, ते पाहता त्यांच्यावर ही कारवाई झाली हेच एक आश्चर्य असले तरी खरी कसोटी ही पुढेच लागेल, जेव्हा या तपासाची दिशा योग्य राहून कठोर कारवाई होईल तेव्हा. कारण अशी प्रकरणे बाहेर येताना मोठा गाजावाजा होतो, काही दिवस संशयित कारागृहात जातो, लोक समाधान मानतात. नंतर तपास सुरू, कारवाई बंद ही वेळ येते. काही कालावधीनंतर लोक विसरतात आणि कारवाई करणारे हुश्श करतात. पुढे पहिले पाढे पंचावन्न. किमान या प्रकरणात असे काही होता कामा नये, असे वाटते.
कॅप्टन अशोक खरात ही आसामी लहान नाही, हे एव्हाना सर्वांच्याच लक्षात आले असेल. त्याच्या संपर्कात किंवा फार तर भक्तांच्या मांदियाळीत कोण कोण नाही.. अगदी केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, मिलिंद नार्वेकर यांच्यापासून ते अनेक मंत्री, संत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींचा समावेश दिसतो. गेल्या तीस वर्षांत खरातने शब्दश: हजारो लोकांवर मायावी जादू केली. त्याची मोडस ऑपरेंडीच अशी असायची की, समोरची व्यक्ती त्याला सर्वार्थाने शरण जायचीच. काहींना तो ज्योतिषी वाटायचा. काहींना अंकशास्त्रतज्ज्ञ. अतिहुशार मंडळींना तो विश्वरहस्यशास्रतज्ज्ञ म्हणजेच कॉस्मॉलॉजिस्ट वाटायचा. प्रत्यक्षात त्याच्याकडे काळ्या जादूची शक्ती होती, असेही सांगितले जाते. ब्लॅक मॅजिक म्हणून अगदी परदेशातही प्रसिद्ध असलेली ही अतिंद्रिय शक्ती त्याला ज्ञात होती, असाही दावा काही लोक करतात. अगदी गावठी भाषेत सांगायचे तर त्याला कर्णपिशाच्चविद्या अवगत होती. या विद्येत पिशाच्चांना वश करून त्यांच्याकडून पाहिजे ते कार्य करून घेणे अशा विद्या पारंगत व्यक्तींना शक्य असते, असे सांगितले जाते. त्यामुळेच खरातकडे कोणीही आले, तर पहिल्याच भेटीत तो संबंधित व्यक्तीच्या अत्यंत बारीकसारीक गोष्टींचा इतिहास सांगायचा. तो तंतोतंत बरोबर असायचा.
जीवनातील अगदी खासगी गोष्टींचीही तपशीलवार माहिती जेव्हा तो सांगायला लागतो, तेव्हा संबंधित आश्चर्याने थेट त्याच्या पायावरच लोटांगण घालतो. त्यानंतर तो स्वाभाविकच कायमस्वरुपी अंधभक्त होतो. खरात हे कसे करतो, याला काही उत्तर नाही. त्याच्याकडे असलेल्या कथित विद्येबाबत खात्री करण्याची कोणाची शामत नाही. त्या विद्येची खातरजमा करायची म्हणजे जणू विषाचीच परीक्षा. साहजिकच, आजपावेतो कोणीही त्याच्या नादी लागले नाही. आज हे लिहित असतानाही अंधश्रद्धा निर्मूलनवाले उद्या हे वाचल्यावर काय म्हणतील अशी रास्त शंका वाटते. यावरून लक्षात यावे की, खरात जे काही करीत होता, ते किती गहन, गूढ आणि अतिंद्रिय असेल. अर्थात, एवढा मातब्बर माणूस त्या पोलिसांच्या एका दंडुक्यात सरळ कसा झाला आणि त्याला अवगत असलेल्या विद्येने ऐनवेळी दगा दिला की त्याच पसार झाल्या, तसेच त्याला नेहमी मदत करणारे पिशाच्च पोलिसी खाक्यालाही घाबरले का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. कोणा तरी एका रणरागिणीने हिंमत दाखविली आणि एका नराधमाचा नृशंस चेहरा समोर आला.
थोडक्यात काय, तर कोणीतरी हिंमत दाखवायची गरज होती. यापूर्वीच ती दाखविली गेली असती तर भल्या भल्या काळ्या जादूही सुसाट पळाल्या असत्या. आता दाबलेल्या, दडपलेल्या आणि पीडित असलेल्यांची गुन्हे दाखल करायला रांग न लागली तरच नवल. त्यादिवशीची ती रात्र खरातच्या दृष्टीने काळरात्र बनून आली. अनेकांच्या जीवाशी खेळण्यासही कमी न करणार्या या माणसाला अंधार कोठडीत कसे वाटत असेल. जी विद्या त्याने आत्मसात केली, तिचा समाजहितासाठी उपयोग केला असता तर कदाचित खरात आज हिरो ठरला असते; परंतु त्याने या शक्तीचा गैरवापर केल्याने, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे रे ईश्वर, भक्तिगीतानुसार फळ मिळते आहे, असे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. घरीार पर्शींशी षेीसशीीं रपूेपशफी रलींळेपी, ळीं वशश्रर्ळींशीी र्क्षीीींळलश ुळींह शिीषशलीं लरश्ररपलश रपव रीं ीळसहीं ींळाश..असे इंग्रजीतही एक सुभाषित आहे. कर्म ही संज्ञा हिंदू धर्मात असली तरी तिच्या अस्तित्वावरून अनेक धर्मातही त्याचे दाखले दिले जातात. विशेषत: अध्यात्मात तर कर्म हाच पाया आहे. कर्म हे नेहमी व्याजासह परतफेड करते असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा चांगले कर्म करा, फळाची अपेक्षा नाही केली तरी ते हमखास मिळणारच, हे गीतेचे तत्त्वज्ञान समोर येते.
पण कू-कर्म केले तर त्याची सव्याज शिक्षा ही मिळणारच, असेही त्यातून अध्याहृत होते. खरात याने आपल्या कथित विद्येचा प्रभाव विशेषत: प्रभावशाली राजकारणी मंडळींवर टाकला. राजकारणाच्या धांदलीत सततच्या अस्वस्थतेवर उतारा म्हणून असले बाबा सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास टाकणारे पुढारी हल्ली पायलीचे पन्नास झाले आहेत. त्यामुळेच सारासार विचारही न करता अशा बाबांच्या हाती आपले भवितव्य देऊन ते मोकळे होतात. अशा व्यक्ती राजकारणात असल्याने त्यांचे काहीच बिघडत नाही. पण त्यांचे बाबांच्या असे भजनी लागणे हे सामान्यांच्या दृष्टीने आकर्षण ठरते. बाबा व राजकारणी आपापल्या मस्तीत दंग असतात, पण बाबावर भरवसा ठेवून सामान्य मात्र लुटले जातात, शोषले जातात. भारताच्या अलीकडच्या इतिहासात सहजच डोकावून पाहिले तरी अशा बाबांमुळे झालेल्या सामाजिक उलथापालथीची कलेवरं ठिकठिकाणी पाहायवयास मिळतील. खरात प्रकरणात तर याचा ठायीठायी प्रत्यय येतो. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील अनेक पुढारी खरातच्या पायाशी येऊन गेले.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तर खरातची पाद्यपूजा केल्याची चित्रफितच समाज माध्यमांवर फिरते आहे. महिलांचे शोषण करणार्या खरातची केवळ अशी पूजाच त्यांनी केली नाही तर या खरातच्या संस्थेवर सदस्य म्हणूनही होत्या. दोन महिन्यांपूर्वी अशीच हिंमत एका महिलेने दाखविली तेव्हा सदर महिलेसह एका पत्रकाराचाही आवाज बंद करण्याचे पवित्र कार्य याच चाकणकर बाईंनी केले होते, हेदेखील आता पुढे आले आहे तरी बाई पदाला चिकटून राहिली. बाईंचे अनेक उपदव्याप पुढे येऊ लागल्यानंतर हे सारे सरकारच्याच मुळाशी येईल, या भीतीने दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बाईंना बोलावून राजीनामा द्यायला सांगितला हे बरे झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्याच चाकणकर बाई आहेत. त्यांनी चाकणकर बाईंना हाकलायला तसाही फार वेळ घेतला.
या दोन्ही महिलांनी किमान महिलांविषयीचा दृष्टिकोन तरी स्वच्छ व पारदर्शी ठेवायला हवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरातच्या शिवनिक आश्रमातील ईशान्येश्वर मंदिरात येणेजाणे होते. याव्यतिरिक्तही उभयतात अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळेच शिंदेंनीदेखील या प्रकरणातील मौन सोडून पीडित महिलांची बाजू घ्यायला हवी. चाकणकरांच्या राजीनाम्याने हे प्रकरण काहीअंशी शिथिल होऊ शकते. तसे ते होणार नाही आणि यातील सर्व बारीकसारीक तपशिलांचा तपास होऊन दोषींना शासन होईल, ही अपेक्षा. अशी हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, हे पाहायला हवे. तसेच अशा बाबा-बुवांच्या नादी लागू नये ही संतांची शिकवण समाज विसरू लागण्यानेच हे अरिष्ट ओढवले आहे. तेव्हा समाजानेच आता शहाणे होण्याची गरज आहे. आजच्या युगात दुनिया झुकती हैं, बस झुकानेवाला चाहिए, हा परिपाठ आहेच. त्याला छेद देण्याची हिंमत दाखवायला हवी.




