नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयातशुल्क लादल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटू लागलेले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच समाचार घेतला. राजनाथ सिंग यांनी ‘काही लोक भारताच्या विकासावर नाराज आहेत. त्यांना भारताचा विकास होत आहे हे आवडत नाही’ असे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख न करता ते म्हणाले, “सर्वांचा बॉस आम्हीच आहोत, असे ज्यांना वाटते त्यांना भारताची जागतिक पातळीवर होत असलेली प्रगती पाहावत नाहीये”.
ट्रम्प यांच्यावर निशाणा साधताना राजनाथ सिंह म्हणाले की काही “बॉस” भारताच्या जलद विकास दराचा हेवा करतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले, “काही लोक भारताच्या जलद प्रगतीवर खूश नाहीत. त्यांना ते आवडत नाही. ‘सबके बॉस तो हम हैं’, मग भारत इतक्या वेगाने कसा वाढत आहे?”.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, बरेच लोक भारतीयांच्या वस्तू इतर देशांमध्ये बनवलेल्या वस्तूंपेक्षा महाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. याद्वारे भारतीय वस्तूंची मागणी कमी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र भारत वेगाने प्रगती करत आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो की आता जगातील कोणतीही शक्ती भारताला जगातील मोठी शक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही.
ते लोक असा प्रयत्न करत आहेत की, भारतात तयार झालेल्या वस्तू जेव्हा विदेशात जातील, तेव्हा त्या महाग कशा होतील, याचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील लोकांनी तयार केलेल्या वस्तू जेव्हा महाग होतील, तेव्हा त्याची खरेदी होणार नाही. पण मी सांगू इच्छितो भारत वेगाने पुढे जात आहे. भारताला महासत्ता होण्यापासून आता कुणी रोखू शकत नाही.”
म्हणून भारतावर २५ टक्के कर लादला
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने अलीकडेच भारतीय वस्तूंवर 25 टक्के कर आणि 25 टक्के अतिरिक्त दंड लादला. भारत रशियाच्या युद्ध प्रयत्नांना निधी देत असल्याचा आरोप वॉशिंग्टनने केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. यासोबतच, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला “मृत” म्हटले आणि आणखी शुल्क वाढवण्याची धमकीही दिली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी भारतात विकसित झालेल्या उत्पादन क्षेत्राची माहिती दिली. ते म्हणाले, “संरक्षण क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली आहे. एकेकाळी आपण बहुसंख्य उपकरणे आयात करत होतो. विमाने, शस्त्र, तंत्रज्ञान किंवा इतर अनेक गोष्टी आपण विदेशातून विकत घेत होतो. पण आज आपण यातील बऱ्याच गोष्टी भारतातच उत्पादित करत आहोतच. पण जगातील इतर देशांनाही आपण त्याची निर्यात करत आहोत.”
राजनाथ सिंह म्हणाले, “काही देशांना भारतात बनवलेले उत्पादने, भारतीय हातांनी बनवलेल्या वस्तू, इतर देशांच्या तुलनेत महाग व्हाव्यात असे वाटते, जेणेकरून किमती वाढल्यावर जग त्या खरेदी करणे थांबवेल.” त्यांनी विश्वास व्यक्त केला की आता जगातील कोणतीही शक्ती भारताला एक प्रमुख जागतिक शक्ती होण्यापासून रोखू शकत नाही.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा भारत फक्त 600 कोटींची संरक्षण उत्पादने निर्यात करत होता. आता आपण 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या संरक्षण वस्तू निर्यात करत आहोत. ही भारताची ताकद आहे आणि हे नवीन भारताचे नवीन संरक्षण क्षेत्र आहे. त्याची निर्यात सतत वाढत आहे आणि वाढतच राहील.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





