मुंबई | Mumbai
महराष्ट्रातील (Maharashtra) राज्यसभेच्या (Rajyasabha) सात जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक (Election) पार पडणार आहे. याकरिता अर्ज भरण्याची अंतिम तारीख ०५ मार्च असून, ०६ मार्चला अर्जांची छाननी होणार आहे. तर उमेदवारांना ०९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार राज्यातील सात जागांपैकी सहा जागांवर महायुतीचे आणि एका जागेवर मविआचा खासदार निवडून जाऊ शकतो. त्यामुळे या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरिता सर्वच पक्षांनी बैठकींचा सपाटा लावला आहे.
महायुतीमध्ये सहा पैकी भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागा मिळणार आहे. तसेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो इतके संख्याबळ त्यांच्याकडे आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार (Rajyasabha Candidate) निश्चित करण्यासाठी आज (मंगळवारी) रात्री १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यात पक्षाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. भाजपच्या कोट्यातून एक जागा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी सोडली जाणार आहे. तर उर्वरित तीन जागांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, उर्वरित तीन जागांसाठी भाजपाकडून विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, भागवत कराड यांच्या नावांवर चर्चा सुरु असल्याचे बोलले जाते. यात विनोद तावडे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर आणखी दोन जागांसाठी तिघांमधून कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ
भाजपा- १३२ – १ – = १३१ (शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त) शिवसेना (शिंदे गट)- ५७, राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ४१ – १ = ४० (अजित पवारांच्या निधनामुळे एक जागा रिक्त) काँग्रेस -१६, राष्ट्रवादी (शरद पवार गट)- १०, शिवसेना (ठाकरे गट) – २०, समाजवादी पार्टी -२, जनसुराज्य शक्ती -२, राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, एमआयएम-१, सीपीआय (एम)- १, शेतकरी कामगार पक्ष – १ , राजर्षी शाहू विकास आघाडी १ आणि अपक्ष – २




