Wednesday, May 20, 2026
HomeनगरShrirampur : रामपूर कोकरे येथे वाळू व्यावसायिकांकडून महिलांवर दगडफेक

Shrirampur : रामपूर कोकरे येथे वाळू व्यावसायिकांकडून महिलांवर दगडफेक

वाळू वाहतुकीच्या रस्त्यावरून तणाव || पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर कोकरे येथे सरकारी लिलावातून मंजूर झालेल्या वाळू उपसा ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या कामावरून सोमवारी तणाव निर्माण झाला. रस्त्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवर काही वाळू व्यावसायिकांकडून भ्याडपणे दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. सुदैवाने या प्रकारात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून रामपूर परिसरातील ग्रामस्थांनी गावाजवळील वाळू उपशाला तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांनी शहावली बाबा दर्गाहसमोर आंदोलन व उपोषण करत प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे गावातून वाळू वाहतूक होऊ देणार नसल्याचे कळविले होते. मात्र, शासनाच्या नियमानुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन मुंबईस्थित एका कंपनीला वाळू उपशाचा ठेका देण्यात आला होता.

स्थानिकांच्या मते, वाळू उपशामुळे शेती, पाझर व्यवस्था, जनावरांसाठीचे पाणी तसेच भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तसेच सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याकडेही हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली होती. त्यांनीही जिल्हाधिकारी व काही मंत्र्यांशी संपर्क साधून वाळू उपसा थांबविण्याचे आवाहन केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राकडे जाणारा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असल्याचे समजताच सुमारे 60 ते 70 महिला घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी झालेल्या वादातून काहींनी महिलांवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलांनी झाडांचा आसरा घेत गावातील नागरिकांना संपर्क केला. त्यानंतर मोठ्या संख्येने तरुण घटनास्थळी दाखल झाल्याने तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

महसूल प्रशासन गप्प का ?
तालुक्यामध्ये वाळू तस्करांकडून एवढ्या मोठ्या घटना घडत असताना महसूल विभागाचे अधिकारी मुग गिळून गप्प का? अशा घटनांवर महसूल प्रशासनाची कारवाई करण्याची गरज असताना, पोलीस प्रशासनाकडून कारवाई होते, यामागचे कोडे सामान्यांना न उलगडणारे आहे, रामपूर कोकरे याठिकाणी महिलांवर वाळूतस्कांनी भ्याडपणे दगडफेक केली, ही अत्यंत निंदनिय घटना आहे. या घटनेच्या विरोधात महसूल प्रशासनाचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाही, यामागचे नेमके कारण काय? याबाबत गोदापट्ट्यातील नागरिकांत उलट-सूलट चर्चा सुरु आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : राष्ट्रवादीतील मतभेदांना कांद्याचा तडका

0
कांदाप्रश्नाने नाशिकसह उत्पादक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पेट घेतल्याने विविध राजकीय पक्षही सक्रिय झालेले दिसतात. नेहमीप्रमाणे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसने यात आघाडी घेतल्याचे दिसते. नाही म्हणायला...