संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून आपले दोन उमेदवार मैदानात उतरविले आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख तर विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघातून विद्यमान संचालक गणपत सांगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या रूपाने पुन्हा एकदा संगमनेरला जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद मिळणार का, हा मुद्दा या निवडणुकीतील महत्त्वाचा ठरणार आहे. याचबरोबर थोरात यांच्या भूमिकेकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सहकार क्षेत्रावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात संगमनेरचे प्रतिनिधित्वही सातत्याने महत्त्वाचे राहिले आहे.
यावेळी थोरात यांनी दोन उमेदवारांना मैदानात उतरविल्याने जिल्हा बँकेच्या आगामी सत्तासमीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तब्बल 18 वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर यांनी तीन वर्षे, तर माधवराव कानवडे आणि रामदास वाघ यांनी प्रत्येकी पाच वर्षे उपाध्यक्षपद सांभाळले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात संगमनेरचे स्थान सातत्याने अधोरेखित झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत रणजीतसिंह देशमुख हे बाळासाहेब थोरात यांचे जावई असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे.
संगमनेरला यापूर्वी उपाध्यक्षपद मिळालेले असताना आता देशमुख यांच्या माध्यमातून पुन्हा हे पद संगमनेरकडे येणार का, याबाबत सहकार क्षेत्रात उत्सुकता आहे. मात्र, याचे चित्र निवडणुकीनंतर संचालक मंडळातील समीकरणे आणि निर्णयप्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक शक्य तितकी बिनविरोध करण्यासाठी विविध नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यात कोणते उमेदवार रिंगणात राहतात, कोणत्या मतदारसंघात तडजोडी होतात आणि माजी मंत्री थोरात यांची भूमिका काय राहते, याकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या निवडणुकीत संगमनेरचे दोन उमेदवार आणि विशेषतः देशमुख यांच्या उमेदवारीभोवतीचे सत्तासमीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.




