अंबासन | वार्ताहर Ambasan
कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी तालुयातील सावतावाडी येथे मालेगाव-सुरत राज्य महामार्गावर कांदे रस्त्यावर ओतत रास्ता रोको आंदोलन छेडले. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. पोलीस अधिकार्यांनी संतप्त शेतकर्याची समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घ्यावे लागले.
दरम्यान, सावतावाडीलगत कांद्यास मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे शेतकर्यांनी आपला संताप रस्त्यावर ठिय्या देत व्यक्त केला. मात्र राज्य महामार्गावर दोन्ही बाजुने वाहतूक पुर्णत: ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. तीन तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षा फारच कमी मिळत आहेत. काही ठिकाणी बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपये दर मिळतो आहे, जो उत्पादन खर्च सोडा वाहतूक खर्च देखील भरून काढत नसल्याने अशा परिस्थितीत शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सरकारने हमीभाव जाहीर केला नाही, तसेच निर्यात बंदीमुळे शेतमाल बाजारात अडकल्याने शेतकर्यांचा संताप उफाळून आला. कजवाडेसह परिसरातील संतप्त शेतकर्यांनी सागर भामरे यांच्या नेतृत्वाखाली सावतावाडी येथील महादेव मंदिरासमोर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव-सुरत राज्य महामार्गावर रस्त्यावर कांदे ओतून ठिय्या मांडत आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी केंद्र व राज्य शासनाचा निषेध असो, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शेतकर्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
कांद्याला मिळत असलेल्या भावामुळे शेतकरी अक्षरश: आर्थिकदृष्ट्या विवंचनेत सापडले आहेत. अशातच चांगला भाव मिळेल या अपेक्षेने उन्हाळी कांदा गेल्या पाच-सहा महिन्यापासून चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र चाळीतील कांदा देखील पाऊस व बदलत्या हवामानामुळे सडू लागला आहे. मात्र या संकटाकडे केंद्र व राज्य सरकार लक्ष देत नसल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर यावे लागले असल्याचे यावेळी संतप्त शेतकर्यांनी सांगितले.
कांद्याला हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, कांदा निर्यात त्वरित सुरु करावी, कर्जमाफी जाहीर करावी आणि चाळीतील सडलेल्या कांद्याचे पंचनामे होवून नुकसानभरपाई मिळावी. व कांद्याला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी या मागणीसाठी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसात शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प केला जाईल, असा इशारा यावेळी शेतकर्यांनी दिला.
या आंदोलनात कजवाडे येथील सागर भामरे यांच्यासह सुनील शेवाळे, कैलास कापडणीस, एकनाथ कापडणीस, प्रविण कदम, मोहन जाधव, मुरलीधर कापडणीस, किरण कापडणीस, अनिल भदाणे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.




