Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : रेशन दुकानातून साखर वाटप सुरू

Ahilyanagar : रेशन दुकानातून साखर वाटप सुरू

जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांना दिलासा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तब्बल दीड वर्षांनंतर अखेर रेशन दुकानांतून साखरेचे वितरण पुन्हा सुरू होत आहे. टेंडर प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे बंद असलेले साखर वाटप आता नव्याने सुरू करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला पाच हजार क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या तीन महिन्यांसाठी जिल्ह्यास आवश्यक साखर उपलब्ध झाली आहे.

- Advertisement -

सामान्य कुटुंबांमध्ये सण-उत्सवाच्या काळातच गोड पदार्थांची रेलचेल असते. मात्र, दीड वर्षांपासून रेशन दुकानांत साखर उपलब्ध नसल्याने अंत्योदय कार्डधारकांना साखरेसाठी बाजारातील 44 रूपये प्रतिकिलो दराचा मोठा बोजा सहन करावा लागत होता. आता रेशन दुकानांतून 20 रूपये प्रतिकिलो दराने एक किलो साखरेचे वाटप होणार असल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक ताण हलका होणार आहे. पुरवठा विभागाला मिळालेल्या साखरेच्या नवीन नियतनानंतर जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानांत साखर पोहोचविण्याचे काम जलद गतीने सुरू आहे.

काही दुकानांमध्ये साखर उपलब्ध झाली असून उर्वरित दुकानांत पुढील काही दिवसांत पुरवठा पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व अंत्योदय कार्डधारकांना साखर मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात एकूण 87 हजार 64 अंत्योदय कार्डधारक असून त्यातून लाभ घेणार्‍या कुटुंबांची संख्या 3 लाख 86 हजार 34 इतकी आहे. या सर्वांसाठी पाच हजार क्विंटल साखरेचा साठा जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात उपलब्ध झाला आहे.

गोदामातून तालुकानिहाय रेशन दुकानांत साखर पाठविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. साखर उपलब्धतेमुळे यंदाचे नववर्ष सामान्य कुटुंबांसाठी ‘गोड’ ठरणार असून, दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. पुरवठा विभागाने मागील काही महिन्यांपासून टेंडर मुद्द्यावर शासनाशी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यानंतर मिळालेल्या मंजुरीमुळे अखेर साखर वितरण सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...