Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedरावेर : अटवाडे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात होते रेल्वेप्रवासाची अनुभूती

रावेर : अटवाडे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात होते रेल्वेप्रवासाची अनुभूती

रावेर |प्रतिनिधी –

अटवाडे (ता.रावेर) येथील येथील जिल्हा परिषेदेच्या शाळेची रंगरंगोटी करून रुपडे पालटले आहे. या शाळेच्या वर्ग खोल्यामध्ये रेल्वेच्या डब्याची अनुभूती होते. यासाठी सरपंच गणेश महाजन यांनी यासाठी घेतलेल्या प्रामाणिक मेहनतीमुळे शाळेची विद्यार्थ्यांना गोडी लागली आहे.

- Advertisement -

केळी पट्ट्यातील प्रसिद्ध गांव आणि तापी नदीच्या काठाने समृद्धी लाभलेल्या व दिवंगत जानकीराम पाटील यांच्या उदार दातृत्वाने संपूर्ण तालुक्यात ओळखल्या जाणाऱ्या अटवाडे गावाची धुरा गणेश महाजन या उदयोन्मुख उद्यमशील युवा नेतृत्वाच्या हातात आहे. त्यांनी गावातील शाळेला दिलेले रूप पाहून तोंडातून वा निघाल्याशिवाय राहणार नाही. इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत अद्यावत अशा १० संगणकाची जोडणी असलेली सुसज्ज कॉम्प्युटर लॅब तयार केली आहे.

शाळेत ९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. चारही वर्गासाठी अभ्यासक्रमाचे सोफ्टवेअर खरेदी करून त्यांना शिक्षण दिले जाते. याच शाळेला आता रेल्वेच्या डब्ब्याप्रमाणे रंगकाम करून विद्यार्थ्यामध्ये अधिक गोडी निर्माण करण्यासाठी वर्ग तयार केले आहे. या वेगळ्या वर्गाची मोठी उत्सुकता मुलांना असल्याने शाळेतील उपस्थिती चांगली आहे. हल्ली लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने शाळा कधी सुरु होतील याची आस विद्यार्थ्यांना लागली आहे.

सुसज्ज असलेल्या शाळेत मात्र वर्ग चार आणि शिक्षक १ आहे. या ठिकाणी आणखी दोन शिक्षक मिळावे यासाठी सरपंच आमदार, जिल्हापरिषद अध्यक्षा, शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठपुरवा करत आहे. मात्र अद्यापही त्यांना शिक्षक न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशाच आहे.

गांव सोयीचे नसल्याने अनेक शिक्षकांची नापसंती

पूर्वी ज्या शाळेचे शिक्षक त्याचं गावात राहावे लागत होते. सध्या मात्र अशी सक्ती नसल्याने, अनेक शिक्षक जवळपास ४०-५० किमी प्रवास करून ये-जा करतात. यामुळे बसेस थांबतील का? येण्या-जाण्यासाठी वाहने मिळतील का?हा विचार करून शिक्षक शाळांची मागणी करतात. ग्रामीण भागात आतमध्ये असलेल्या गावांना प्रवासासाठी अधिक बसेस नसल्याने, याठिकाणी येण्यास अनेक जण उत्सुक नसतात, ग्रामीण भागातील शाळामध्ये एक शिक्षकांवर शाळा सुरु आहे. अटवाडे देखील या अडचणीचा सामना करत आहे.

१४ वित्त आयोगाच्या निधीतून शाळांचे रूप पालटले आहे .इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सोफ्टवेअर खरेदी करून त्याद्वारे आभ्यासक्रम शिकवला जातो. १० संगणकांची जोडणी असलेली लॅब अद्यावत आहे. शाळेत सोनी कंपनीचे एलईडी डिस्प्ले बसवले आहे. शाळेला १४ वित्त आयोगातून निधी वापरून प्लास्टिक पेंट व कोटिंग करून रेल्वेच्या डब्ब्याप्रमाणे रंग दिला आहे. गेल्या तीन वर्षापासून १ शिक्षक चार वर्ग चालवत आहे. या ठिकाणी शिक्षक द्यावे यासाठी अनेक राजकीय पदाधिकारी यांना साकडे घातलें आहे.

गणेश महाजन, सरपंच अटवाडे

अटवाडे शाळेच्या उपक्रमाबाबत माहिती घेतली आहे.खूप सुंदर पद्धतीने शाळा सजवण्यात आली आहे.अनेक ठिकाणी शिक्षक जागा रिक्त असल्याने एक-दोन शिक्षक शाळा चालवत आहे. या शाळामध्ये शिक्षक देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा केली आहे.लवकर या शाळेला शिक्षक मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

– जितू पाटील, सभापती पंचायत समिती रावेर

- Advertisment -

ताज्या बातम्या