मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत सदस्यपदासाठी १ लाख ७७८ अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ८ हजार ३३४ अर्ज सादर झाले आहेत. २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतीमधील एकूण ६ हजार ८५९ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या २८८ जागांसाठी हे अर्ज दाखल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी याबाबतची माहिती दिली. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर नगरपालिका आणि नगरपंचायतमधील लढतींचे चित्र स्पष्ट होईल.
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक अर्ज
छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून सदस्यपदासाठी सर्वाधिक ११ हजार ८११ अर्ज दाखल झाले आहेत. तर अध्यक्षपदासाठी १ हजार १९२ अर्ज आले आहेत. नाशिक विभागात अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातून सदस्यपदासाठी ९ हजार ५९०,तर अध्यक्षपदासाठी ७१३ अर्ज निवडणूक अर्ज भरले झाले. कोकण विभागात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात सदस्यपदासाठी ३ हजार १० तर अध्यक्षपदासाठी २०० अर्ज दाखल आले आहेत.
विदर्भातील अमरावती विभागात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमधून सदस्यपदासाठी ८ हजार ४९२ आणि अध्यक्षपदासाठी ६९३ अर्ज दाखल झाले. नागपूर विभागात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातून सदस्यपदासाठी ७ हजार १२५ तर अध्यक्षपदासाठी ५७७ अर्ज दाखल झाले आहेत. तर पुणे विभागात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून सदस्यपदासाठी ११ हजार ४४ तर अध्यक्षपदासाठी ८२३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.





