अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
उमेदवारी अर्ज माघारीवरून घेण्यात आलेला आक्षेप गैरसमजूतीतून घेण्यात आल्याबाबतचे लेखी पत्र अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्यानंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा बिनविरोध निवडून येणार्याचा मार्ग मोकळा झाला असून रात्री उशीरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे, प्राजक्त तनपुरे यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला नव्हता.
अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज सूचक शेहबाज खालिद शेख यांच्या माध्यमातून मागे घेण्यात आला होता. त्याला पानसरे यांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याबरोबर पणन महासंघाच्या अध्यक्षपदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला होता. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3.10 मिनिटांनी सुरू झालेला गोंधळ रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालू होता. पानसरे यांची प्रथम प्राजक्त तनपुरे यांनी समजूत काढली. तासभर चर्चा करून देखील पानसरे यांचे समाधान झाले नाही. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांच्याबरोबर चर्चा केली.
आ. जगताप यांनी पानसरे यांची पालकमंत्री विखे यांच्याबरोबर देखील चर्चा घडवून आणली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा घडवून आणली. त्यावेळी पानसरे यांनी पणन महासंघात भाजपच्या आमदारांकडून होणार हस्तक्षेप तसेच पणन महासंघाची सुरू असलेल्या चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेऊन पाच वर्ष महांसघाचे अध्यक्षपद पानसरे यांच्याकडे राहणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली.
दरम्यान, पानसरे यांनी जिल्हाधिकार्यांना यापूर्वी दिलेल्या पत्रावरून पुन्हा लेखी पत्र दिले की गैरसमजूतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याबाबत आक्षेप घेतला होता. सूचकाने दिलेला उमेदवारी अर्ज माघारीच्या पत्रावर माझी स्वाक्षरी असल्याचे मान्य केले. त्यामुळे पानसरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, प्राजक्त तनपुरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सपशेल लोटांगण
बराच वेळा आमच्या मतमतांतरे आणि समाज गैरसमज असतात. त्याचबरोबर विरोधी पक्षाकडूनही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत असतो. पण महायुती अभेद आहे. राज्यात महाविकास आघाडीची अवस्था पाहिल्यास ती सपशेल या निवडणुकीत लोटांगण घेतले अशी अवस्था त्यांची झाली असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी माघार घेतलेल्या चारही उमेदवारांचे आभार मानले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगत त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सर्व मतदार आणि नगरसेवकांच्या समस्या व प्रश्न विधिमंडळात प्रखरपणे मांडण्याचा विश्वासही तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या आग्रहावरून माघार : दत्तात्रय पानसरे
प्राजक्त तनपुरे यांचे माघारी घेण्यासाठी विनंती करणे कामच होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्व नेत्यांच्या आग्रहानंतर मी माघार घेतल्याचे दत्तात्रय पानसरे म्हणाले. प्राजक्त तनपुरे यांना एकच विनंती आहे की आमच्या नगरसेवकांची काम करा, त्यांना न्याय द्या.
पानसरेंकडून आक्षेप मागे
अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी जे काही आक्षेप घेतले होते ते सर्व मागे घेतलेले आहे. त्यांनी जी सही केली त्याच्याबद्दल त्यांची शंका होती, त्याचे सुद्धा निराकरण झालेले आहे. त्यांना कोणत्याही अर्जावर त्यांचा आक्षेप नाही व तक्रारी नाही जो सुरुवातीला सूचक यांनी सही केली ती सुद्धा योग्य आहे. त्यामुळे आता पानसरेंचे कोणत्याही प्रकारचे आक्षेप राहिलेले नाहीत व त्यांनी तसं लेखी दिलं आहे व रेकॉर्डही त्यांचं केलेलं आहे. अशी माहिती नगरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.




