Tuesday, June 16, 2026
HomeनगरCrime News : शेताच्या बांधावर मुरूम टाकण्यावरुन वाद, कुऱ्हाडीचे वार करुन शिक्षकाची...

Crime News : शेताच्या बांधावर मुरूम टाकण्यावरुन वाद, कुऱ्हाडीचे वार करुन शिक्षकाची हत्या; आरोपी फरार

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)

श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील गावडे मळा परिसरात शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १२ जून) सकाळी घडली. या घटनेत निवृत्त शिक्षक पोपटराव रावजी गावडे (वय ७५) यांचा कुऱ्हाडीच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या विलास दादा गावडे याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसोरे खांड येथील गावडे मळा परिसरात राहणारे पोपटराव गावडे हे निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या शेजारी राहणारा विलास गावडे याच्याशी शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला.

त्यावेळी विलास गावडे याने शिवीगाळ व दमदाटी केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, सकाळी नऊच्या सुमारास विलास गावडे हा हातात कुऱ्हाड घेऊन बांधाजवळ फिरत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती. काही वेळानंतर पोपटराव गावडे यांच्या घरासमोरील शेतात आरोपीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. कुऱ्हाडीने डोक्यात जोरदार वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीय आणि नातेवाईक घटनास्थळी धावून येताच आरोपी तेथून फरार झाला.

जखमी अवस्थेत पोपटराव गावडे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, विजय पोपटराव गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास दादा गावडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...