कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगावकरांनी तळ्यातील गाळ काढला आहे. आता कोपरगाव तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ आलेली असून आता त्याची सुरवातच करण्यात आल्याची जहारी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता केली आहे.
शहरातील रिद्धी सिद्धी नगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सा रे ग म प लिटिल चॅम्प मध्ये विजेती ठरलेल्या गौरी अलका पगारे, तसेच डॉ. रामदास आव्हाड यांना राष्ट्रीय आयुर्वेद गुरु हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी आ. आशुतोष काळे,राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाच्या राजेश परजणे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष काका कोयटे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉ.रामदास आव्हाड, माजी नगरसेवक जनार्धन कदम, प्रांताधिकारी माणिक आहेर, रविकाका बोरावके, मंदार पहाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, विनायक गायकवाड, कैलास ठोळे, सुधीर डागा, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, डॉ. अजय गर्जे, राजेंद्र शिंगी, धरम बागरेचा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, शिर्डीला साई नगर जिल्हा म्हणून घोषित करावा तसेच शिर्डी येथे जिल्हाधिकारी कार्यालय आणावे व कोपरगाव महानगरपालिका करावे त्यामुळे उन्नतीच्या व प्रगतीच्या वाटा निर्माण होणार आहे. तसेच आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून पाण्याची गंगा आणण्याचे काम केले असून आता विखे व काळे यांच्या जोडीने कोपरागाव तालुक्यात विकासाची गंगा आणावी.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगावातील बेरोजगार तरुणांना व विकासाला चालना मिळावी यासाठी गेल्या चार वर्षांपासून एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची फलस्वरूपी म्हणून नामदार विखे यांच्या मदतीने एमआयडीसीसाठी जागा व एमआयडीसी मंजुरी देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे कोपरगावकरांच्या वतीने नामदार विखे यांचे आभार मानतो.
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे म्हणाले की, कोपरागावकरांशी संवाद होणे गरजेचे आहे ही संधी काकांनी दिली आहे. नगर जिल्ह्यामध्ये तर कोपरगावात आज तालुक्यात आज दोन वाळू डेपोची वितरण सुरुवात करण्यात आली आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. तसेच शहराच्या पिण्याच्या पाण्याची सोय कशी होईल यासाठी प्रयत्न करत असून विकासासाठी सर्व निधी देणार आहे. आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे ते त्या त्या शहरातील लोकांनी ठरवणे गरजेचे आहे. रोजगारीचा दर मागील 50 वर्षापेक्षा जास्त आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांनी राजकारणी सोडून विकासाचे मंथन होणे गरजेचे आहे.
आपल्या तालुक्यात कोण कुठं चालले आहे याची उत्सुकता जास्त असून ते सोडून शहराच्या सर्वांगीण विकासाची चर्चा होणे गरजेचे आहे.जोपर्यंत आपण परावलंबी झालेलो आहे त्यामुळे सर्वात जास्त संकटे निर्माण होत आहे. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. एमआयडीसी आणण्यात आपण मागे का राहिलो याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे. मात्र आता आम्ही मंजूर केलेली एमआयडीसी ही राज्यातील अव्वल असेल. तसेच देशात एकच गॅरेंटी आहे.ती म्हणजे पंतप्रदान नरेंद्र मोदी. मात्र येथील काही लोक डळमळीत झाले आहे. ते दुसर्याच्या नादी लागलं आहे.मात्र नागरिकांनी कशाचीच
चिंता करू नये. आता आपल्या महायुतीचा आमदार आशुतोष काळे आहेत आणि त्याला माझी गॅरेंटी आहे. त्यामुळे कोणाचाही विचार करू नका, तसेच काहींना तालुक्यात शिवाजी महाराजांचे पुतळे बसावता आले नाहीत. प्रत्येक तालुक्यात 1 कोटी रुपये खर्चून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार आहे. त्याची सुरवात राहुरी, संगमनेर, पारनेर, मधून करणार असल्याचेही विखे म्हणाले.