दिल्ली । Delhi
भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेट प्रेझेंटर रिद्धिमा पाठक हिने बांगलादेश प्रीमियर लीगच्या (BPL) आगामी हंगामातून माघार घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. रिद्धिमाच्या या निर्णयामुळे क्रीडा विश्वात एकच चर्चा रंगली असून तिच्या राष्ट्रप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या काही तासांपासून बांगलादेशमधील काही माध्यमांनी आणि सोशल मीडियावर रिद्धिमा पाठकबद्दल एक खोटी बातमी पसरवली होती. “रिद्धिमाला बांगलादेश प्रीमियर लीगच्या अँकरिंगमधून काढून टाकण्यात आले आहे,” असा दावा या बातम्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र, रिद्धिमाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवेचा पर्दाफाश केला असून बांगलादेशचा खोटारडेपणा जगासमोर आणला आहे.
रिद्धिमाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत सत्य परिस्थिती मांडली आहे. ती म्हणाली, “सत्य महत्त्वाचे आहे. गेल्या काही तासांपासून मला बीपीएलमधून काढून टाकल्याची चुकीची बातमी फिरत आहे. हे पूर्णपणे असत्य आहे. मी आगामी हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय स्वतः घेतला आहे. माझ्यासाठी माझा देश नेहमीच प्रथम येतो. मी इतर कोणत्याही व्यावसायिक करारापेक्षा किंवा कामगिरीपेक्षा माझ्या देशाला आणि क्रिकेट खेळाला जास्त महत्त्व देते.”

रिद्धिमा पुढे लिहिते की, “मी वर्षानुवर्षे अत्यंत प्रामाणिकपणा, आदर आणि उत्कटतेने या खेळाची सेवा केली आहे आणि हे भाग्य मला मिळाले आहे. ही निष्ठा कधीही बदलणार नाही. मी नेहमीच प्रामाणिकपणा आणि खेळाच्या भावनेसाठी खंबीरपणे उभी राहीन. ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते. तुमचे प्रेम आणि संदेश माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. क्रिकेट हा खेळ सत्याला पात्र आहे.”
सध्या बांगलादेश भारतासमोर नवनवीन अटी ठेवताना दिसत आहे. नुकतेच बांगलादेशने आगामी टी-२० विश्वचषक भारतात खेळण्याऐवजी श्रीलंकेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. राजकीय अस्थिरता आणि दोन्ही देशांमधील वाढता अविश्वास यामुळे क्रिकेटच्या मैदानावरही याचे पडसाद उमटत आहेत. रिद्धिमा पाठकने घेतलेला हा वैयक्तिक निर्णय याच तणावपूर्ण वातावरणाचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.
रिद्धिमाने या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला असला, तरी तिने घेतलेल्या भूमिकेमुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या माध्यमांची मोठी नाचक्की झाली आहे. भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर “देशभक्त रिद्धिमा” अशा शब्दांत तिचे समर्थन केले आहे.




