नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ज्याच्याकडे श्रद्धेने आणि अपेक्षेने पाहिले, त्याच नराधमाच्या विकृत कृत्यांमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मात्र, ‘खरात न्यूड फाईल्स’ प्रकरणातील धक्कादायक वास्तव आता समोर येत असून, यातील पीडित महिलांना केवळ खरातच्या अत्याचाराचाच नव्हे, तर स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या क्रूरतेचाही सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत भयावह असून समाजात एक नवा ‘सामाजिक वनवास’ सुरू झाल्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंतच्या तपासासह सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील धागेदोरे उघड झाल्यानंतर पीडित महिलांकडे (Women) पाहण्याचा समाजाचा आणि त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा दृष्टिकोन कमालीचा दूषित झाला आहे. शिर्डीतील एक हृदयद्रावक प्रकार पुढे येत असून एका सुशिक्षित आणि श्रीमंत घरातील महिलेला केवळ खरातच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून चक्क आलिशान घरातून हाकलून देण्यात आल्याचे समजते. सध्या या महिलेला घराबाहेरील गोठ्यात राहण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती कळते.
ही एकाच महिलेची व्यथा नसून, खरातच्या ‘कॅबिन’ची पायरी चढलेल्या शेकडो महिलांना आज आपल्याच घरात ‘परके’ मानले जात आहे, असे बोलले जात आहे. ज्या महिलांनी विश्वासाने आपली समस्या खरातसमोर मांडली, त्यांच्या वाट्याला आता दुहेरी कोंडी आली आहे. एकीकडे फसवणुकीचे दुःख आणि दुसरीकडे पती व सासरच्या मंडळींकडून मिळणारी ‘बंगाळ’ वागणूक. “शील गमावले” असा शिक्का मारून अनेक पतिदेव आपल्या पत्नीला हीन वागणूक देत असून घराच्या चार भिंतींत होणारा हा मानसिक छळ शारीरिक जखमांपेक्षाही खोल आहे. तो एक गंभीर ‘सामाजिक प्रश्न’ बनू शकतो अशीही चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, काही पीडित महिलांनी नाशिकसह आहिल्यानगरातील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु केले आहेत.
समुपदेशनाची गरज
ज्या महिलांनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी हिंमत दाखवायला हवी, त्याच महिला आज कौटुंबिक बहिष्कारामुळे खचल्या आहेत. अशा परिस्थितीत या महिलांचे समुपदेशन गरजेचे आहे. जर कुटुंबाकडूनच त्यांना झिडकारले गेले, तर त्यांच्यासमोर टोकाचे पाऊल उचलण्याशिवाय पर्याय नाही. खरातसारख्या प्रवृत्तींचा निषेध करताना, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या या महिलांना पुन्हा सन्मानाने जगण्याची संधी देणे ही सुजाण समाजाची जबाबदारी आहे, असे कौटुंबिक नाते संबंधातील काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. पती आणि कुटुंबाने संशयाची पिसाट नजर बाजूला सारून सहानुभूतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, असे ग्रासित आणि शोषित वर्गासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठांचे मत आहे.
मुद्दे
- ‘खरात फाईल्स’ मधील धक्कादायक दृश्यांनी समाजमन सुन्न झाले असतानाच, या प्रकरणाचे पडसाद पीडित महिलांच्या खासगी आयुष्यात उमटत आहेत. बाहेरच्या नराधमाने लुटलेली अब्रू आणि आता हक्काच्या माणसांनी उगारलेला संशयाचा वरवंटा, अशा कात्रीत या महिला अडकल्या आहेत.
- श्रद्धा आणि विश्वासापोटी एखाद्याच्या दारी जाणे हा गुन्हा नाही. खरातने विश्वासाचा घात केला, यात महिलांची चूक ? समाजाने पीडितेला दोष देण्यापेक्षा त्या विकृतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
- एकीकडे फसवणुकीचा मानसिक धक्का आणि दुसरीकडे हक्काच्या घरातून होणारा तिरस्कार, यामुळे या महिला प्रचंड नैराश्यात. अशा वेळी कुटुंबाने आधार देणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांचे मत
- जिल्हा प्रशासन, पोलीस आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या महिलांसाठी तातडीने विशेष ‘समुपदेशन केंद्र’ सुरू करण्याची गरज




