Thursday, November 19, 2026
Homeक्राईमCrime News : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्जत तालुक्यातील राशीन-चिलवडी रस्त्यावर सापळा रचून पकडले. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील एका पसार आरोपीचा समावेश आहे.

- Advertisement -

अटकेतील तिघांकडून पोलिसांनी तीन दुचाकी, तीन मोबाईल, कटावणी, कोयता, मिरची पूड यासह दोन लाख 41 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडा प्रतिबंधक गस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते. यामध्ये अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, भिमराज खर्से, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, दीपक जाधव, जालिंदर साखरे यांचा समावेश होता. पथकाला मंगळवारी (17 नोव्हेंबर) राशीन ते चिलवडी रस्त्याने काही जण दुचाकीवरून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली.

पोलिसांनी पाठलाग करून बाक्या बंड्या काळे (वय 39), गोट्या बंडू काळे (वय 25, दोघे रा. आखोणी, ता. कर्जत) आणि धोंड्या ईश्वर भोसले (वय 28, रा. बेलगाव, ता. कर्जत) यांना ताब्यात घेतले. चौकशीत पळून गेलेल्यांची नावे शुभम गहिनीनाथ भोसले (रा. बेलगाव), रोहित नितीन चव्हाण आणि सुमित नितीन चव्हाण (दोघे रा. केडगाव, अहिल्यानगर) अशी समोर आली. दरम्यान, अटक केलेला धोंड्या भोसले हा पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पसार होता. या गुन्ह्यात मोक्का लावण्यात आला आहे.

ताज्या बातम्या