अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुपा, पारनेर, बेलवंडी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडे घालणारी टोळी जेरबंद केली असून, त्या टोळीकडून घरफोडीचे गुन्हेही घडकीस आले आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 25 जानेवारी 2025 रोजी रात्री योगेश खंडू शेरकर (रा. सोबलेवाडी, पठार वस्ती, ता. पारनेर) यांचे घर फोडून चोरांनी आत प्रवेश केला. त्यांना व त्यांच्या आईला मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी चोरून नेली. याबाबत योगेश शेरकर यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यात पूर्वी सिध्देश काळे (रा. वाळुंज पारगाव, ता. नगर), श्रीहरी हरदास चव्हाण (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) यांना अटक केली होती. तर, अन्य संशयित आरोपी पसार होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश भिंगारदे, हृदय घोडके, भाऊसाहेब काळे, बाळसाहेब खेडकर, अमोल कोतकर, आकाश काळे, फुरकान शेख व मेघराज कोल्हे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अन्य संशयित आरोपींना विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले. त्यात नागेश विक्रम भोसले (वय 20, रा. घोसपुरी, ता. नगर), पवन राजू भोसले (वय 18, रा. कोपरगाव, ता. कोपरगाव), देविदास जैनू काळे, ऋतिक पैदास चव्हाण (दोघे रा. विलोणी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), उमेश रवी भोसले (रा. नक्षीनगर, कोपरगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता पवन भोसले (रा. कोपरगाव), देविदास काळे, सिध्देश काळे, अजय काळे (पसार), धीरज काळे (पसार), गणेश भोसले, श्रीहरी हरीदास चव्हाण, बाळू झारू भोसले सर्व रा. जलसेनपिंप्री, ता. पारनेर (पसार), आवड्या सुभाष उर्फ ठुब्या भोसले रा. मौजे, ता. पारनेर (पसार) यांच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले.
ताब्यातील संशयित आरोपींनी सुपा, एमआयडीसी, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे घडकीस आले. ताब्यातील नागेश भोसले, पवन भोसले व देविदास काळे यांना गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल वाटून घेतल्याचे सांगितले. सोने सारोळा येथील सोनार पवन राजेंद्र बाफना याला विक्री केल्याचे सांगितले. ताब्यातील संशयित आरोपी पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नागेश भोसले, पवन भोसले, देविदास काळे, ऋतिक चव्हाण, उमेश भोसले यांना पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत.