मुंबई । Mumbai
दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. मात्र, रोहित पवारांच्या या भूमिकेवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांनी कडाडून टीका केली असून, हे सर्व केवळ ‘राजकीय नाटक’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी नुकतीच बारामती पोलीस ठाण्यात व्हीएसआर (VSR) कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली. रोहित पवार सातत्याने पत्रकार परिषदांच्या माध्यमातून नवनवीन प्रश्न उपस्थित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला.
आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवारांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे. “रोहित पवारांना केवळ पक्षाचा कब्जा हवा आहे आणि त्यासाठीच ते आमच्या नेत्यांवर नाहक खापर फोडत आहेत,” असा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला. जर रोहित पवारांचे अजितदादांवर खरं प्रेम असेल, तर त्यांनी असे नाटक करण्याची गरज नाही. रोहित पवार स्वतः कोणतीही तपास यंत्रणा नाहीत; त्यामुळे त्यांच्याकडे जर काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते रडगाणे न गाता थेट तपास यंत्रणांकडे सुपूर्द करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
अनिल पाटील पुढे म्हणाले की, “जर त्यांना सुनेत्रा पवार यांच्याबद्दल इतकीच आत्मीयता होती, तर जेव्हा त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत होत्या, तेव्हा त्यांनी साथ सोडून जायला नको होतं. सुनेत्राताई लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पत्रकारांशी संवाद साधतील. अमोल मिटकरी असोत किंवा आम्ही सर्व आमदार, आमचीही हीच मागणी आहे की या घटनेचा पूर्ण तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावे. तपास यंत्रणा त्यांचे काम चोखपणे करतीलच.”
दुसरीकडे, आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “रोहित पवार दररोज नवनवीन तथाकथित पुरावे समोर आणत आहेत. जर हे पुरावे खरे असतील, तर ते ज्येष्ठ नेते शरद पवार, सुनेत्राताई, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसमोर का मांडत नाहीत?” असा सवाल शेळके यांनी केला. अजितदादांच्या निधनाबाबत कोणीही राजकारण करत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी रोहित पवारांना टोला लगावला की, त्यांनी दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे हे पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे.
सुनील शेळके यांनी पुढे स्पष्ट केले की, पक्षाने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून त्यांचा योग्य तो सन्मान राखला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातील प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सभागृहात सविस्तर उत्तर दिले आहे. त्यामुळे रोहित पवार करत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे शेळके यांनी ठामपणे सांगितले.




