मनमाड । प्रतिनिधी Manmad
शहर आणि रेल्वेसाठी पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. आज गुरुवार दि. 8 रोजी पाटाद्वारे रोटेशनचे पाणी पाटोदा साठवणूक तलावापर्यंत पोहचले आहे. पाण्याचे रोटेशसाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी प्रयत्न केले होते तर पालिका प्रशासनाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता. रोटेशन सोडण्यात आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
वागदर्डी धरणाने तळ गाठल्यामुळे शहरात महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आवर्तनाचे पाणी सध्या पाटोदा साठवणूक तलावात घेतले जात आहे. त्यानंतर पंपिंग करून पाणी वागदर्डी धरण किंवा थेट फिल्टर प्लॅन्ट मध्ये घेतल्या नंतर शहरात पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली.
मनमाड शहराचा पाणीपुरवठा हा पालखेड धरणातून मिळणार्या पाण्याच्या अवर्तानावर अवलंबून आहे. दोन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील अद्यापही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे अद्यापही धरण भरू शकले नाही. पावसाअभावी सध्या वागदर्डी धरण कोरडेठाक पडले आहे. सध्या धरणात पाण्याच्या मृत साठा शिल्लक असून त्यातून नगरपरिषदेतर्फे शहरात महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अद्यापही नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
महिनाभर साठवून ठेवलेले पाणी टिकवणे अशक्य झाले आहे. यामुळे नागरिकाचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केली होती अखेर पालखेड मधून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर आज गुरुवारी पाणी पाटोदा साठवणूक तलावांपर्यंत पोहचले आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर ते पाटोदा साठवणूक तलावात घेतले जाते तेथून पंपिंग करून पाणी वागदरडी धरणात आणल्या नंतर शहरात पाणीपुरवठा केला जाईल असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.