नागपूर | Nagpur
देशात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहे. नव्या सरकारचा शपथविधी झाला, एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. मंत्र्यांना खाते वाटप जाहीर झाले. आता निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी देशातील सध्यस्थिती निवडणुकांबाबत भाष्य केले आहे. नागपूरमध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समापन समारंभाला’ ते संबोधित करत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, “निवडणुकीचे निकाल आलेत. सरकार सुद्धा बनले आहे. जे झाले, ते का झाले? कसे झाले? हे लोकशाहीचे नियम आहेत. समाजाने आपले मत दिले. संघाचे लोक यामध्ये पडत नाही. आम्ही निवडणुकीत परिश्रम करतो. जे सेवा करतात, मर्यादेने चालतात, सगळे लोक काम करतात. पण कुशलता लक्षात घेतली पाहिजे. मर्यादा आपला धर्म आणि संस्कृती आहे”.
या निवडणुकीत संघासारख्या संघटनेला ओढण्यात आलं. बरंच काही बोललं गेलं. टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन गोष्टी मांडल्या गेल्या. विद्येचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करायचा असतो. मात्र या आधुनिक तंत्राचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. निवडणूक लढताना एक प्रकारची मर्यादा असते”
मणिपूरबद्दल काय म्हणाले भागवत?
मणिपूरबाबत मोहन भागवत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. “मागच्या वर्षभरापासून अधिक काळ मणिपूर जळतेय, मणिपूरचा विचार करुन तिथे शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. हे कुणी घडवून आणले आहे? याकडे लक्ष दिले पाहिजे. अजून बरीच कामे करायची आहेत. सगळी कामे सरकार करणार नाही. मणिपूर अनेक वर्ष शांत होते. आता पुन्हा पेटले आहे. जुने वाद बंद झाले पाहिजेत. द्वेषाचे वातावरण निर्माण झाल्याने मणिपूरमध्ये त्राहीमाम परिस्थिती आहे. त्यामुळे मणिपूर शांत करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.” असे मोहन भागवत म्हणाले आहेत.