अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटीई कायद्यांतर्गत 25 टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. 14 ते 27 जानेवारी या काळात पालकांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आतापर्यंत आरटीई अंतर्गत 4 हजार 712 अर्ज प्राप्त झाले आहेत. दरवर्षी आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत दुर्बल घटकांतील (मागासवर्गीय, तसेच 1 लाखांखालील उत्पन्न गटातील) पालकांच्या पाल्यांना आपल्या घराजवळच्या तीन किलोमीटर परिघातील स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेश दिले जातात.
साधारण विनाअनुदानित शाळा अधिक प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्याच आहेत. त्यात शुल्क अधिक असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील पाल्यांना शिक्षण घेता येत नाही. परंतु आरटीईच्या नियमांतर्गत 25 टक्के प्रवेशाचा फायदा या गरजूंना होतो. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत यंदा 348 शाळांत 3 हजार 287 जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यात आतापर्यंत जिल्ह्यात 4 हजार 712 अर्ज प्राप्त झाले आहेत. 25 टक्के आरक्षित जागा असल्याने या जागांसाठी अर्ज करताना 10 शाळांची निवड करावी लागणार आहे. अर्ज करण्याअगोदर पालकांना शाळा आणि घर यामधील अंतर तपासावे लागणार आहे. हे अंतर गूगल मॅपद्वारे निश्चित करावे लागेल. अर्ज करताना घराचा पत्ता, जन्मतारीख, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदी कागदपत्र आवश्यक आहेत.