Wednesday, June 10, 2026
HomeराजकीयRupali Chakankar : संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला…; अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर...

Rupali Chakankar : संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला…; अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आक्रमक

मुंबई । Mumbai

“एका संपूर्ण वस्त्रात असलेल्या महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला. पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि सावित्रीमाईंच्या विचारांचा आहे. इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर चिखलफेक होऊ नये, म्हणून माझी ही लढाई आता थेट कायद्याच्या चौकटीतून असेल,” अशा कडक शब्दांत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) माजी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.

- Advertisement -

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नाव गोवले गेल्यानंतर राजकीय वर्तुळातून रूपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती. खरात प्रकरणाचा तपास पूर्णपणे पारदर्शक व्हावा, यासाठी नैतिकतेच्या भूमिकेतून चाकणकर यांनी महिला आयोग आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. मात्र, तरीही त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आलेले आरोप अतिशय वेदनादायक होते, असे सांगत त्यांनी आता आरोप करणाऱ्या सर्वांविरुद्ध कायदेशीर शड्डू ठोकला आहे.

या प्रकरणावर आपले मौन सोडताना रूपाली चाकणकर म्हणल्या, “खरात प्रकरणाशी किंवा त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीच्या भागीदारीशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. मी कधीही कोणत्याही महिलेला खरातकडे घेऊन गेले नव्हते. असे असतानाही गेल्या दीड-दोन महिन्यांत अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य भाषेत विधाने करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. इतकेच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर करून बनावट व्हिडिओ देखील तयार करण्यात आले.” खरातच्या पाद्यपूजेच्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, “इतरांप्रमाणेच माझ्या कुटुंबीयांनीही खरातला केवळ एक आध्यात्मिक गुरू मानले होते. तो व्हिडिओ अत्यंत जुना असून, मी महिला आयोगाची अध्यक्ष होण्यापूर्वीचा आहे.” आशा मिरगे यांच्या अडचणीत वाढ;

चाकणकर यांनी माहिती दिली की, एका राजकीय डिबेटमध्ये आशा मिरगे यांनी त्यांच्याविरोधात अत्यंत असभ्य आणि बेताल वक्तव्ये केली होती. याप्रकरणी मिरगे यांना तीन वेळा कायदेशीर नोटीस पाठवूनही त्यांनी ती स्वीकारली नाही. अखेर चाकणकर यांनी माझगाव कोर्टात फौजदारी फिर्याद दाखल केली. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आशा मिरगे यांना २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आरोप करणाऱ्या सर्वांना

कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ राजकीय द्वेषापोटी चारित्र्यहनन करणाऱ्या इतरही अनेक महिलांना दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवण्यात आल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले. “सत्य प्रखरतेने सर्वांसमोर आहे. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. हा लढा केवळ माझा नसून प्रत्येक महिलेच्या अस्मितेचा आहे आणि मी तो शेवटपर्यंत लढणार,” असा ठाम विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

0
मुंबई । Mumbai "ज्या देशात अन्नदाता सुखी नसतो, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. परंतु आज आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने उलटे चित्र पाहायला मिळत आहे....