Friday, July 3, 2026
Homeनगरग्रामीण विकासासाठी समन्वयाची गरज : डॉ. आशिया

ग्रामीण विकासासाठी समन्वयाची गरज : डॉ. आशिया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, शाश्‍वत उपजीविका, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) जागी सुरू करण्यात आलेल्या ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ या योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. हे अभियान केवळ रोजगार उपलब्ध करून देणारे नसून जलसंधारण, मृदसंधारण, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीव्दारे शाश्‍वत विकास साधणारे आहे. अभियानांतर्गत हाती घेण्यात येणार्‍या प्रत्येक कामाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेत पूर्तता सुनिश्‍चित करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. ग्रामसभेच्या सहभागातून स्थानिक गरजांनुसार विकासकामांचे नियोजन केल्यास ग्रामीण नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य होईल. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणीवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

125 दिवसांच्या रोजगाराची हमी

ग्रामीण भागातील अकुशल शारीरिक काम करण्यास इच्छुक प्रत्येक प्रौढ सदस्याला केंद्र शासनाकडून 125 दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. अभियानांतर्गत 318 प्रकारची कामे मंजूर आहे. रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगार भत्ता देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. मजुरीचा दर प्रतिदिन 317 रूपये निश्‍चित करण्यात आला असल्याचे उपजिल्हाधिकारी पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने हल्ला; पाच जणांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) येथील भिंगार रस्त्यावरील फुटबॉल मैदानाजवळ पूर्ववैमनस्यातून एका युवकावर कोयता आणि बांबूच्या दांडक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात उदय अब्राहम ढगे...