Friday, May 1, 2026
HomeराजकीयRupali Patil Thombare : रूपाली चाकणकरच मुख्य सूत्रधार; अशोक खरात प्रकरणात रूपाली...

Rupali Patil Thombare : रूपाली चाकणकरच मुख्य सूत्रधार; अशोक खरात प्रकरणात रूपाली पाटील-ठोंबरे यांचा खळबळजनक आरोप

पुणे । Pune

भोंदू बाबा अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण रॅकेटच्या मुख्य सूत्रधार राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर असल्याचा गंभीर आरोप अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. खरातच्या प्रत्येक कृत्यात चाकणकर यांचा सहभाग असून, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

रूपाली पाटील-ठोंबरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणाचे भीषण वास्तव मांडले. अशोक खरातने जवळपास २५० ते ३०० व्हिडिओ तयार करून अनेक महिलांवर अत्याचार केले आहेत. हे प्रकार अत्यंत किळसवाणे असून, या सर्व कृत्यांना रूपाली चाकणकर यांचे पाठबळ लाभल्याचा दावा त्यांनी केला. “भोंदू खरातने केलेल्या अत्याचारात चाकणकर यांचा संगनमत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणात सह-सूत्रधार म्हणून घोषित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा,” असे ठोंबरे म्हणाल्या.

या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आणताना ठोंबरे यांनी सांगितले की, खरातच्या गैरकृत्यांचा भांडाफोड एका पत्रकाराने एका वर्षापूर्वीच केला होता. मात्र, त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करत रूपाली चाकणकर यांनी संबंधित पत्रकाराला धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. भोंदू बाबाला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा सर्रास वापर केल्याचे एसआयटी (SIT) च्या तपासात समोर आले असल्याचा दावा त्यांनी केला.

https://www.facebook.com/share/p/1HsyyvYsXG

या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांवरही ठोंबरे यांनी बोट ठेवले आहे. अशोक खरातने ८०० कोटी रुपयांची मालमत्ता कशी जमा केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, खरातला व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या दोन व्यक्तींसोबत पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मध्यस्थीने ‘सेटलमेंट’ करण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले. जर या गुन्ह्यात कोणत्याही आयएएस (IAS) अधिकाऱ्यांनी खरातला मदत केली असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत महिलांना दिलासा दिला असून, चाकणकर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. मात्र, केवळ राजीनामा पुरेसा नसून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. जर चाकणकर यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही, तर याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार असल्याचा इशारा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी दिला आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांनी न्यायालयात जाऊन खरातच्या तोंडाला काळं फासावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ताज्या बातम्या