Thursday, May 21, 2026
Homeराजकीयप्रवक्तेपदावरून डच्चू मिळताच रुपाली पाटील ठोंबरे यांचा थेट संघर्षाचा इशारा, म्हणाल्या…

प्रवक्तेपदावरून डच्चू मिळताच रुपाली पाटील ठोंबरे यांचा थेट संघर्षाचा इशारा, म्हणाल्या…

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून रुपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरी यांना वगळल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, या निर्णयानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी थेट पक्षातील कथित अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि गरज पडल्यास ‘संघर्ष’ करण्याचा इशारा दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

- Advertisement -

रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यामागे त्यांचे वारंवार केलेले पक्षविरोधी विधान हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणावरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली होती. या भूमिकेमुळे त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. याच वादाच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपले स्पष्टीकरण दिले होते. मात्र, ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच, त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. पक्षातील या कारवाईमुळे अंतर्गत धुसफूस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रवक्तेपदावरून वगळण्यात आल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुरुवातीला एक शांत आणि संयमी पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते, “मी आज पुण्याच्या बाहेर आहे, प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्यांची नेमणूक केली आहे, त्यात माझ्यासह आमदार श्री. अमोल भाऊ मिटकरी, सौ. वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत. या यादीबद्दल मा. अजितदादांना भेटून, बोलून याविषयी माहिती घेईल, मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल.”

मात्र, काही वेळातच रुपाली पाटील ठोंबरे यांच्या भूमिकेत आक्रमकता आल्याचे दिसून आले. त्यांनी एक जाहीर फेसबुक पोस्ट करत थेट पक्षातील व्यवस्थेवर टीका केली आहे आणि आपण संघर्षाची भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या दुसऱ्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “शेतकरीकन्या डॉ. संपदा मुंडे यांना न्याय न देता, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार. माझा आवाज दाबला जाईल? प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे.” पक्षातील नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपला इतिहास संघर्ष करणार्‍यांचा असल्याचे ठणकावून सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, “आपला इतिहास हा अन्याय सहन करणार्‍यांचा नाही; गरज पडली तर ‘ख्वाडा’ करणार्‍यांचा आहे.” या विधानातून त्यांनी पक्षातील आपल्या विरोधकांना आणि नेतृत्वाला थेट संघर्षाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एकीकडे रुपाली पाटील ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून वगळण्यात आले असताना, दुसरीकडे मारहाण प्रकरणामुळे वादात सापडलेले सूरज चव्हाण यांना अजित पवार यांनी प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत पुन्हा एकदा संधी दिली आहे. या निर्णयावरही राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकंदरीत, रुपाली पाटील ठोंबरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, पुढील काळात त्या कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकार्‍यांना पदोन्नती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य पोलीस दलातील पदोन्नतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून राज्यभरातील 77 सहायक पोलीस निरीक्षकांना (एपीआय) पोलीस निरीक्षक (पीआय) पदावर, तर 488 पोलीस...